छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे मा. आयुक्त श्री. अमोल येडगे यांच्या निर्देशानुसार, मा. अतिरिक्त आयुक्त-२ श्रीमती कल्पिता पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ. उज्वला भामरे यांच्या अधिपत्याखाली आरोग्य विभागाचा वतीने दि. 16 जून 2026 ते 31 जुलै 2026 या कालावधीत मनपा शहर हद्दीत अतिसार नियंत्रण मोहीम राबविण्यात येत आहे. अतिसारामुळे होणारे बालमृत्यू रोखणे हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
या मोहिमेचा शुभारंभ दि. 17 जून 2026 रोजी एन-8 रुग्णालय येथे माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. मेघा जोगदंड यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी डॉ. मनोज बजाज, डॉ. चंद्रकला गायकवाड, डॉ. वरद शिंदे, श्रीमती नंदा जाधव, श्रीमती सुनिता बुनगे, श्रीमती अनुसया सोनटक्के तसेच एन-8 रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.
मोहिमेदरम्यान आशा सेविका त्यांच्या कार्यक्षेत्रातील घरोघरी भेटी देऊन नागरिकांना स्वच्छता, सुरक्षित पाणी व अतिसार प्रतिबंधाबाबत मार्गदर्शन व समुपदेशन करणार आहेत. तसेच 0 ते 5 वर्षे वयोगटातील अतिसारग्रस्त बालक आढळल्यास त्यांना दोन ओआरएस (ORS) पाकिटे व झिंकच्या 14 गोळ्यांचे विनामूल्य वितरण करण्यात येणार आहे.
याशिवाय सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये ORT कॉर्नरची स्थापना करण्यात येणार असून, अतिसार प्रतिबंध, परिसर स्वच्छता, हात धुण्याची शास्त्रीय पद्धत, ओआरएसच्या वापराबाबत जनजागृती तसेच ओआरएस तयार करण्याचे प्रात्यक्षिक नागरिकांना दाखविण्यात येणार आहे.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.

