छत्रपती संभाजीनगर दि.१७ जून प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर शहरातील मोती कारंजा, गांधी नगर, औषधी भवन, दुल्हा-दुल्हन चौक, संभाजीपेठ, नाथ मार्केट आणि सेना भवन परिसरातील नालेसफाई कामांची स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
पाहणीदरम्यान नालेसफाईचे सुमारे ५० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित ५० टक्के काम अद्याप बाकी असल्याचे निदर्शनास आले. पावसाळ्यापूर्वी सर्व नालेसफाईची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
तसेच नाल्यांमध्ये कचरा टाकणारे व सांडपाणी सोडणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले. मोती कारंजा, गांधी नगर, औषधी भवन आणि नाथ मार्केट परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचेही सांगण्यात आले असून, त्याद्वारे नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्यांवर लक्ष ठेवता येणार आहे.
पावसाळ्यात पाणी तुंबणे, नागरिकांना होणारा त्रास आणि संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी नालेसफाईची सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश यावेळी देण्यात आले. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ठिकाणी नाल्यांवर जाळ्या बसविणे, नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करणे आणि पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी विशेष दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले.यावेळी उप आयुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे,कार्यकारी अभियंता अनिल तनपुरे,उप अभियंता आरती नवगीरे,सहायक आयुक्त रमेश मोरे आदींची उपस्थिती होती.
शहरात स्वच्छता व सुशोभीकरण राखण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने विशेष प्रयत्न सुरू असून नागरिकांनीही स्वच्छता राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

