छत्रपती संभाजीनगर : शहरातील गजबजलेल्या गुलमंडी चौकात वाहतुकीस अडथळा ठरत असलेल्या विद्युत पुरवठा केंद्र (डीपी) संदर्भात आज स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.
गेल्या अनेक वर्षांपासून चौकाच्या मध्यभागी असलेली ही डीपी वाहतूक कोंडी तसेच नागरिकांच्या दैनंदिन हालचालींसाठी अडचणीची ठरत आहे. विशेषतः पादचारी आणि वाहनचालकांना यामुळे मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत होत्या.
पाहणीदरम्यान रस्त्यात अडथळा निर्माण करणारे विद्युत खांब तातडीने हटविण्यासह परिसरातील सर्व विद्युत केबल भूमिगत करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. यामुळे वाहतुकीचा मार्ग अधिक मोकळा होण्यासोबतच परिसराचे सौंदर्यीकरण आणि सुरक्षितता वाढण्यास मदत होणार आहे.
या पार्श्वभूमीवर मकरिये यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून डीपीचे तातडीने स्थलांतर करण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू करण्याच्या सूचनाही दिल्या. डीपी स्थलांतरित झाल्यानंतर वाहतुकीचा प्रवाह सुरळीत होण्यास, कोंडी कमी होण्यास आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेत वाढ होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरातील नागरिकांच्या दैनंदिन अडचणी दूर करण्यासह मूलभूत सुविधा अधिक सक्षम आणि सुकर करण्यासाठी महापालिका प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
महाराष्ट्र न्यूज टाइम्स

