छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर शहर वाहतूक शाखेने ट्रिपल सीट वाहन चालविणारे तसेच वाहन चालविताना मोबाईलवर बोलणाऱ्या वाहनचालकांविरोधात विशेष मोहीम राबवून मोठी दंडात्मक कारवाई केली आहे. दि. २६ जून २०२६ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान शहरातील विविध भागांत ही मोहीम राबविण्यात आली.
शहरात वाढती वाहनसंख्या आणि काही वाहनचालकांकडून होणारे वाहतूक नियमांचे उल्लंघन यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम हाती घेण्यात आली.
या मोहिमेदरम्यान:
ट्रिपल सीट दुचाकी चालविणाऱ्या ९०८ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.
त्यांच्याकडून ₹९,०८,००० दंड वसूल करण्यात आला.
वाहन चालविताना मोबाईलवर बोलणाऱ्या २८६ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.
त्यांच्याकडून ₹४,२७,००० दंड आकारण्यात आला.
अशा प्रकारे एकूण १,१९४ वाहनचालकांवर कारवाई करून ₹१३,३५,००० इतका दंड वसूल करण्यात आला.
ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपआयुक्त शर्मिला घारगे-वालावलकर तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त (वाहतूक) सुभाष भुंगा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
वाहतूक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळावा, ट्रिपल सीट प्रवास करू नये, वाहन परवाना व आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत आणि सर्व वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे.
– महाराष्ट्र न्यूज टाइम्स
संपादक : दिनेश गायके

