छत्रपती संभाजीनगर, दि. १५ जून – शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत केवळ शिक्षकांनीच नव्हे, तर खाकी वर्दीतील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही केले. पोलीस अधीक्षक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘पोलीस काका व दिदी’ उपक्रमामुळे जिल्हाभरातील ५०८ शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षिततेचा आणि आपुलकीचा संदेश देण्यात आला.
प्रकाश जाधव यांच्या संकल्पनेतून शाळा प्रवेशोत्सव-२०२६ निमित्त हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा पोलीस दलातील ६० अधिकारी व ४०४ कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यातील ५०८ शाळांना भेट देत विद्यार्थ्यांशी मैत्रीपूर्ण संवाद साधला. उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी आणि दामिनी पथकातील महिला कर्मचाऱ्यांनी ‘पोलीस काका’ व ‘पोलीस दिदी’च्या भूमिकेत विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
यावेळी पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय, लाडगाव येथे भेट देऊन विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध कलाकृतींची पाहणी करत त्यांच्या गुणांचे कौतुक केले. त्यांच्या प्रोत्साहनामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह अधिकच वाढला.
उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना पोलीस हे केवळ कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी नसून त्यांच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर असलेले मित्र आहेत, हा संदेश देण्यात आला. रस्त्यात अडचण आल्यास, पत्ता हरवल्यास किंवा कोणताही त्रास झाल्यास पोलिसांची मदत घेण्यास अजिबात संकोच करू नये, असा विश्वास मुलांच्या मनात निर्माण करण्यात आला.
तसेच डायल ११२ आणि चाइल्ड हेल्पलाईन १०९८ या आपत्कालीन क्रमांकांची माहिती खेळकर पद्धतीने देण्यात आली. अनोळखी व्यक्तींकडून चॉकलेट, बिस्किटे किंवा खेळणी स्वीकारू नयेत, तसेच आई-वडिलांच्या नावाने फूस लावणाऱ्या व्यक्तींसोबत जाऊ नये, अशा महत्त्वपूर्ण सुरक्षा सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या.
सायबर सुरक्षेच्या दृष्टीनेही विद्यार्थ्यांना मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम, ऑनलाइन गेमिंगचे व्यसन, सोशल मीडियाचा अतिरेक आणि इंटरनेटवर वैयक्तिक माहिती शेअर करण्याचे धोके याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या मनातील पोलिसांविषयीची भीती दूर करून त्यांच्याशी विश्वासाचे आणि मैत्रीचे नाते निर्माण करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थी सुरक्षित आणि निर्भय वातावरणात शिक्षण घेऊ शकेल यासाठी ग्रामीण पोलीस दल कटिबद्ध आहे.”
या उपक्रमाचे पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्यात आले असून, ‘पोलीस काका व दिदी’ हे भविष्यातही नियमितपणे शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
खाकीतील ‘पोलीस काका-दिदी’ ठरले विद्यार्थ्यांचे संरक्षण कवच
Related Posts
Add A Comment

