


छत्रपती संभाजीनगर, दि. १४ जून २०२६ – गुन्हे शाखेच्या पथकाने जिन्सी पोलीस ठाणे हद्दीतील किराडपुरा परिसरात छापा टाकून अवैधरित्या साठवून ठेवलेला रेशनिंगचा तांदूळ व इतर जीवनावश्यक वस्तू जप्त केल्या. या प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण ₹17.06 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा राजनन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या कारवाईत गुन्हा क्रमांक 181/2026 अंतर्गत रेशनिंगचा तांदूळ व वाहने असा सुमारे ₹15.75 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी समीर बाबर कुरेशी, फैसल तौफिक भुर्जा आणि फुरकान गणी पठाण यांना अटक करण्यात आली आहे.
तसेच गुन्हा क्रमांक 182/2026 मध्ये रेशनिंगचा तांदूळ व पिकअप वाहन असा सुमारे ₹1.31 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे किराडपुरा येथील गल्ली क्रमांक ५ मधील ठिकाणी छापे टाकण्यात आले. तपासात रेशनिंगचा तांदूळ अवैधरित्या साठवून विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे उघड झाले. आरोपींविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 तसेच संबंधित कायद्यांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने केली. पुढील तपास जिन्सी पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.

