छत्रपती संभाजीनगर (पैठण): (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)
धोंड्याच्या (अधिक) महिन्यातील आज शेवटची एकादशी असल्याने पैठण या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाविकांची अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळत आहे. गोदावरी नदीमध्ये पवित्र गंगा स्नानासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक पैठणमध्ये दाखल झाले आहेत. मात्र, या अत्यंत संवेदनशील आणि अलोट गर्दीच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था तैनात नसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पैठण येथील मुख्य तीर्थक्षेत्र आणि नाथ मंदिराच्या पाठीमागे असलेल्या गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात भाविक स्नानासाठी उतरत आहेत. यामध्ये लहान मुले, महिला आणि वृद्ध भाविकांची संख्या लक्षणीय आहे. नदीपात्रात पाण्याचा अंदाज न आल्यास किंवा अचानक गर्दीचा ताण वाढल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असतानाही, प्रशासनाकडून किंवा संबंधित यंत्रणेकडून या ठिकाणी कोणतीही सुरक्षा चौकी, जीवरक्षक किंवा बॅरिकेडिंग लावण्यात आलेले नाही.
सुरक्षेच्या या गंभीर अभावामुळे भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. “एवढ्या मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय एकत्र आलेला असताना प्रशासनाचे आणि संस्थानाचे याकडे दुर्लक्ष का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. कोणतीही जीवितहानी किंवा अनपेक्षित दुर्घटना टाळण्यासाठी नाथ मंदिर संस्थान आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने या ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करावी, अशी आग्रही मागणी आता भाविकांच्या वतीने केली जात आहे.

