अनधिकृत नळ कनेक्शनधारकांना आठ दिवसांची अंतिम मुदत
अन्यथा थेट कायदेशीर कारवाई
छत्रपती संभाजीनगर दि. ११ जून २०२६ (प्रतिनिधी)
शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यात शिस्त आणण्यासाठी आणि अनधिकृत नळ जोडण्यांना आळा घालण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने बनेवाडी परिसरात आज धडक कारवाई मोहीम राबविली. या मोहिमेमुळे अनधिकृत नळ कनेक्शनधारकांमध्ये एकच खळबळ उडाली असून, प्रशासनाने संबंधितांना आठ दिवसांची अंतिम मुदत देत कडक इशारा दिला आहे.
महानगरपालिकेने या कारवाईसाठी यापूर्वीच पोलीस बंदोबस्ताची मागणी केली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रविणा यादव, उपनिरीक्षक नामदेव सुपे आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या कडक बंदोबस्तात महानगरपालिकेचे अधिकारी व विशेष पथक घटनास्थळी दाखल झाले. अनधिकृत नळ कनेक्शन शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
या मोहिमेत सहाय्यक अभियंता मिलिंद भामरे, पथक प्रमुख रोहित इंगळे, कनिष्ठ अभियंता अमित पंडागळे, विक्रांत सावंत, सुमित बोराडे तसेच महानगरपालिकेच्या अनधिकृत नळ कनेक्शन शोध व निर्मूलन पथकाने सक्रिय सहभाग घेतला.
कारवाई सुरू असतानाच मा. अतिरिक्त आयुक्त-२ कल्पिता पिंपळे यांच्या आदेशानुसार आणि मां.नगरसेवक अब्दुल मतीन खान यांच्या विनंतीनंतर नागरिकांच्या अडचणींचा विचार करून प्रशासनाने तात्पुरती कारवाई स्थगित केली. मात्र, यावेळी नागरिकांना स्पष्टपणे सांगण्यात आले की, ही केवळ अंतिम संधी असून पुढील आठ दिवसांत सर्व संबंधितांनी आपल्या अनधिकृत नळ कनेक्शनच्या संचिका तयार करून नियमानुसार ते अधिकृत करून घ्यावेत.
महानगरपालिका प्रशासनाने याबाबत स्पष्ट भूमिका घेतली असून, दिलेल्या मुदतीत कनेक्शन नियमित न करणाऱ्या नागरिकांवर कोणतीही पूर्वसूचना न देता थेट कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
तरी शहरातील सर्व नागरिकांनी नियमांचे पालन करून पाणीपुरवठा यंत्रणेला सहकार्य करावे. अनधिकृत नळ कनेक्शन नियमित करण्यासाठी ही शेवटची संधी असून, भविष्यात होणाऱ्या कारवाईची संपूर्ण जबाबदारी संबंधित नागरिकांची राहील असे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात येत आहे.

