छत्रपती संभाजीनगर, दि. 9 जून 2026: अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सुरक्षा अधिकारी प्रजा प्रमोद सुरसे यांनी दिलेल्या जबाबानुसार, प्रतिबंधित गुटखा वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकावर काही संशयितांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 8 जून रोजी रात्री मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अन्न व औषध प्रशासनाचे पथक गंगापूर तालुक्यातील रिहेमपूर परिसरात पोहोचले. तेथे एका आयशर टेम्पोमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा व पानमसाला असल्याचा संशय होता. तपासणीदरम्यान सुमारे 25 ते 30 मोठी पोती आढळल्याचा दावा करण्यात आला आहे.
यावेळी दोन मोटारसायकली, एक स्कॉर्पिओ आणि इतर वाहनांमधील काही व्यक्ती पथकावर लक्ष ठेवून असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे. काही वेळानंतर घटनास्थळी आलेल्या स्कॉर्पिओमधील व्यक्तींनी आरडाओरडा करत धमकावल्याचा आरोप आहे. तसेच “गोळ्या घाला” अशा प्रकारची आरोळी देण्यात आल्याचेही जबाबात म्हटले आहे.
महिला सुरक्षा अधिकारी प्रजा सुरसे यांनी आपल्या जबाबात नमूद केले आहे की, एका स्कॉर्पिओ चालकाने त्यांच्यावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या बाजूला झाल्याने बचाव झाला. त्यानंतर संबंधित व्यक्ती व इतर संशयित घटनास्थळावरून पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपास सुरू केला. वाहनांचे फोटो व व्हिडिओ तपासासाठी पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले असून, दोन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती जबाबात नमूद करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक व विक्रीवर बंदी असून अशा प्रकरणांवर राज्यभरात कारवाई सुरू आहे.
– प्रतिनिधी, महाराष्ट्र न्यूज टाईम

