

छत्रपती संभाजीनगर, दि. ९ जून : जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात विशेष मोहीम राबवत एकाच दिवसात 1149 वाहनधारकांवर कारवाई केली. या कारवाईत तब्बल 13 लाख 84 हजार 900 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी जिल्ह्यातील अपघातांची आकडेवारी तपासल्यानंतर बहुतांश प्राणघातक अपघात हे हेल्मेटचा वापर न करणे, भरधाव वेगाने वाहन चालविणे, राँग साईडने वाहन चालविणे, स्टंटबाजी करणे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन यामुळे होत असल्याचे निदर्शनास आले.
सन 2025 मध्ये जिल्ह्यात 846 रस्ते अपघात झाले असून त्यात 481 प्राणघातक अपघातांमध्ये 538 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 344 गंभीर अपघातांमध्ये 455 जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये दुचाकी अपघातांचे प्रमाण सर्वाधिक असून 342 दुचाकी अपघातांमध्ये 357 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
जानेवारी ते मे 2026 या कालावधीत जिल्ह्यात 398 अपघातांची नोंद झाली असून 240 दुचाकी अपघातांमध्ये 144 जणांचा मृत्यू आणि 121 जण गंभीर जखमी झाले आहेत. मागील दीड वर्षातील आकडेवारीनुसार 582 दुचाकी अपघातांमध्ये 501 जणांचा मृत्यू झाला असून हेल्मेटचा वापर न केल्यामुळे अनेकांचा जीव गेल्याचे पोलिसांच्या विश्लेषणातून समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर 8 जून 2026 रोजी जिल्ह्यातील सर्व 23 पोलीस ठाणे आणि जिल्हा वाहतूक शाखेच्या सहभागाने विशेष वाहतूक अंमलबजावणी मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत विना हेल्मेट 563, सिग्नल जंपिंग व पोलिसांच्या इशाऱ्याचे पालन न करणे 132, विना परवाना 89, वाहतुकीस अडथळा निर्माण करणे 61, ट्रिपल सीट 51, विना सीट बेल्ट 30, ओव्हर स्पीड 15, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे 8, फॅन्सी नंबर प्लेट 14, धोकादायक ओव्हरटेक 14, अल्पवयीनाकडून वाहन चालविणे 1 तसेच इतर कलमान्वये 184 प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली.
पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. “हेल्मेट हे दंड टाळण्यासाठी नव्हे तर स्वतःच्या जीवाचे संरक्षण करण्यासाठी आहे. प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेटचा वापर करावा, वेगमर्यादेचे पालन करावे आणि वाहतूक नियमांचे पालन करून अपघातमुक्त जिल्हा घडविण्यास सहकार्य करावे,” असे त्यांनी सांगितले.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशाराही पोलिस प्रशासनाने दिला आहे.

