छत्रपती संभाजीनगर, दिनांक 08 जून:
दिनांक २० मे पासून सुरू झालेल्या माझा कर माझी जबाबदारी विशेष कर आकारणी मोहिमेच्या कामकाजाचा आज आयुक्त अमोल येडगे यांनी आढावा घेतला. व्ही सी द्वारे घेतलेल्या या आढावा बैठकीस मुख्यालयातून अतिरिक्त आयुक्त-२ कल्पिता पिंपळे व उप आयुक्त (कर विभाग) विकास नवाळे उपस्थित होते. तर सर्व झोन अधिकारी आपापल्या झोन मधून बैठकीत सामील झाले. मोहीम कालावधीत झालेल्या कर आकारणी, त्यातून झालेली वसुली तसेच इतर थकीत प्रकरणातील वसुलीचा आयुक्तांनी आढावा घेतला. गत वर्षीच्या तुलनेत कमी वसुली असलेल्या झोन ९ व झोन ४ यांना ताकीद दिली. पोलिस कार्यालयासह सर्व शासकीय मालमत्तांकडे (एकूण ४९३) थकीत असलेल्या (रु.३०.०० कोटी) कर वसुलीचा पाठपुरावा मुख्यालयातून विशेष कक्षाद्वारे करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
चांगली कर वसुली व श्री मित्र ऍप वर चांगल्या प्रकारे रिपोर्टिंग केल्याबद्दल श्री अभिमान भारसाखळे (झोन ६) व श्री संजय परदेशी (झोन १०) यांचा आयुक्त महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याना महिन्याचे उत्कृष्ट कर्मचारी म्हणून गौरवण्यात आले .
पुढील कालावधीत करावयाच्या कार्यवाहीच्या सूचना देऊन आयुक्तांनी बैठक समाप्त केली.

