छत्रपती संभाजीनगर, दि. ७ जून – जिल्ह्यातील अवैध धंदे, गुन्हेगारी आणि असामाजिक प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी राबविलेल्या “ऑपरेशन ऑल आऊट” मोहिमेत मोठी यशस्वी कारवाई केली आहे. अवघ्या १२ तासांत ७२ आरोपींवर ५३ गुन्हे दाखल करत तब्बल १ कोटी १७ लाख ८४ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ग्रामीण पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ६ जून रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून ७ जून रोजी पहाटे ६ वाजेपर्यंत जिल्हाभर एकाच वेळी ही विशेष मोहीम राबविण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांनी मोहिमेचे पर्यवेक्षण केले.
अवैध वाळू तस्करांवर सर्वात मोठी कारवाई
अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध ८ गुन्हे दाखल करण्यात आले. ११ आरोपींना ताब्यात घेऊन ८ वाहने जप्त करण्यात आली. या कारवाईत तब्बल १ कोटी ११ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संबंधित वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्यासाठी आरटीओकडे प्रस्ताव पाठविण्यात येत आहेत.
हातभट्टी दारू अड्ड्यांवर छापे
जिल्ह्यातील २० हातभट्टी अड्ड्यांवर धडक छापे टाकण्यात आले. या कारवाईत ५,६१८ लिटर रसायन, ४१९ लिटर तयार गावठी दारू आणि दारू निर्मितीचे साहित्य जप्त करून नष्ट करण्यात आले. २० आरोपींवर कारवाई करण्यात आली.
देशी-विदेशी दारू विक्रेत्यांवर कारवाई
विनापरवाना दारू विक्री आणि साठवणूक करणाऱ्या १८ आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून ९२५ देशी-विदेशी दारूच्या बाटल्या आणि वाहतूक वाहन जप्त करण्यात आले.
जुगार, गुटखा आणि ड्रंक अँड ड्राईव्हवरही धडक
जुगार खेळणाऱ्या २१ जणांविरुद्ध ६ गुन्हे दाखल करून रोख रक्कम व साहित्य जप्त करण्यात आले. खुलताबाद पोलिसांनी प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करून ७० हजार ६०० रुपयांचा गुटखा जप्त केला. तसेच दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या ३ चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले.
एकूण कारवाई
एकूण गुन्हे दाखल: ५३
एकूण आरोपी: ७२
एकूण जप्त मुद्देमाल: ₹१,१७,८४,१५०
ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी “ऑपरेशन ऑल आऊट” राबवून अवैध धंदे आणि गुन्हेगारीविरोधात कठोर संदेश दिला आहे. आगामी काळातही अचानक नाकाबंदी, कोंबिंग ऑपरेशन आणि विशेष मोहिमा सातत्याने राबवून गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.
— महाराष्ट्र न्यूज टाईम

