छत्रपती संभाजीनगर, दि. 6 जून : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) बीड युनिटने मोठी कारवाई करत जालना जिल्ह्यातील अंबड येथील तहसीलदार विजय लक्ष्मण चव्हाण (वय 47) यांना 6 लाख 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
ACB च्या माहितीनुसार, तक्रारदाराविरुद्ध अवैध वाळू उपसा करणाऱ्या पोकलेन मशिनवर कारवाई न करण्यासाठी तहसीलदार विजय चव्हाण यांनी मोठ्या रकमेची मागणी केली होती. सुरुवातीला त्यांनी आठ दिवसांसाठी प्रतिदिन 1.5 लाख रुपये याप्रमाणे 12 लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर तडजोडीअंती ही रक्कम कमी करून 4 लाख रुपये आणि 6 हायवा टिप्परमधून वाळू वाहतुकीसाठी प्रत्येकी 40 हजार रुपये अशी एकूण 6 लाख 40 हजार रुपयांची लाच मागण्यात आली.
तक्रारदाराने याबाबत 26 मे 2026 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बीडकडे तक्रार दाखल केली होती. पडताळणीत लाचेची मागणी सत्य आढळल्यानंतर ACB ने सापळा रचला.
दि. 6 जून 2026 रोजी सरकारी पंचांसमक्ष कारवाई करण्यात आली. यावेळी तहसीलदार विजय चव्हाण यांनी तक्रारदाराकडून 6 लाख 40 हजार रुपयांची लाच स्वीकारली आणि ACB च्या पथकाने त्यांना तत्काळ ताब्यात घेतले.
सदर कारवाई पोलीस उपअधीक्षक सोपान चिट्टेमपल्ले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईस पोलीस अधीक्षक माधुरी केदार-कांगणे व अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे यांचे मार्गदर्शन लाभले.
या प्रकरणी सातारा पोलीस ठाणे, छत्रपती संभाजीनगर शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नागरिकांना आवाहन
कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याकडून शासकीय कामासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी होत असल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.
ACB हेल्पलाईन : 1064

