अवैध ऑनलाइन चक्री जुगारावर छापे; 11 जणांविरुद्ध 4 गुन्हे दाखल
छत्रपती संभाजीनगर, दि. 6 जून : छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवैध ऑनलाइन चक्री जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई करत 11 जणांविरुद्ध एकूण 4 गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत रोख रक्कम व जुगार साहित्यांसह सुमारे 2 लाख 83 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे फुलंब्री व शिल्लेगाव परिसरातील दोन ठिकाणी छापे टाकण्यात आले. फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीतील कचने शिवार तसेच पिंपळगाव शिवार येथे ऑनलाइन चक्री जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
पहिल्या कारवाईत कचने ते पेरगाव रस्त्यालगत सुरू असलेल्या ऑनलाइन चक्री जुगार अड्ड्यावर छापा टाकून दोन जणांना ताब्यात घेण्यात आले. या ठिकाणाहून रोख रक्कम व जुगार साहित्य मिळून 49 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
त्यानंतर शिल्लेगाव पोलीस ठाणे हद्दीतील पिंपळगाव शिवार येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात आले. एका ठिकाणाहून 1 लाख 30 हजार 700 रुपये, तर दुसऱ्या ठिकाणाहून 1 लाख 3 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईत एकूण 11 जणांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत 4 गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव व अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.

