छत्रपती संभाजीनगर, दि. ५ (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी
) – जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सुखना नदीच्या काठावर वृक्षारोपणाचा भव्य उपक्रम राबविण्यात आला. पर्यावरण संवर्धन आणि हरित शहर निर्मितीच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात भारतीय वंशाच्या अडीच हजारांहून अधिक वृक्षांचे रोपण करण्यात आले.
या कार्यक्रमास समीर राजूरकर, अनुराधा चव्हाण, जी. श्रीकांत, विनय गौडा जी.सी., अमोल येडगे, अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे, उपआयुक्त नंदकिशोर भोंबे, विकास नवाळे, शहर अभियंता संजय कोंबडे, अपर्णा थेटे, उद्यान अधीक्षक विजय पाटील, मुख्य लेखा अधिकारी संतोष वाहुळे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.
सुखना नदी परिसरात करण्यात आलेल्या या वृक्षारोपण मोहिमेत पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला. शहरातील हरित क्षेत्र वाढविणे, जैवविविधतेचे संवर्धन करणे आणि भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ व निरोगी पर्यावरण निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणासोबतच वृक्षांचे संगोपनही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले. नागरिकांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत पर्यावरण रक्षणाची सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचा निर्धार व्यक्त केला.
— महाराष्ट्र न्यूज टाईम

