
छत्रपती संभाजीनगर, दि. ५ : शासन सेवेत कार्यरत तसेच सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित सेवाविषयक अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी संबंधित विभागांनी पूर्ण क्षमतेने कार्य करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिले. त्यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेले पहिले विभागीय कर्मचारी समाधान शिबिर आज विभागीय आयुक्त कार्यालयात संपन्न झाले. या शिबिरात पाच सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचा निपटारा करण्यात आला.
विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्या पुढाकारातून संपूर्ण विभागात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी ‘कर्मचारी समाधान शिबिर’ आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार जून महिन्यातील पहिले विभागस्तरीय शिबिर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात पार पडले. यावेळी सहआयुक्त (महसूल) रिता मेत्रेवार तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. महसूल, महानगरपालिका आणि नगररचना विभागातील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यावेळी आपल्या तक्रारी सादर केल्या.
यावेळी बोलताना विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी सांगितले की, सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना रजा नोंदी, पेन्शन, ग्रॅच्युइटी, वेतनवाढीची थकबाकी तसेच इतर देय रक्कम वेळेत मिळणे हा त्यांचा हक्क आहे. कार्यालयीन प्रक्रियेत होणाऱ्या विलंबामुळे या रकमा वेळेवर न मिळणे ही गंभीर बाब आहे. काही प्रकरणांमध्ये विभागीय चौकशी प्रलंबित असल्याने संबंधितांना त्यांचे आर्थिक हक्क वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे विभागीय चौकशीची प्रकरणे तातडीने निकाली काढून कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
सहआयुक्त (महसूल) रिता मेत्रेवार यांनी शिबिरात प्राप्त झालेल्या तक्रारींची माहिती दिली. तसेच प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘कर्मचारी समाधान शिबिरा’च्या माध्यमातून जिल्हास्तरीय तक्रारी जिल्हा पातळीवर आणि तालुकास्तरीय तक्रारी तालुका पातळीवर सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या उपक्रमामुळे शासन सेवेत कार्यरत तसेच सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक समस्यांचे जलद आणि प्रभावी निराकरण होण्यास मदत होणार आहे.

