महाराष्ट्र न्यूज टाईमसाठी बातमी:
पैठण, दि. ५ जून २०२६: शेतकऱ्याच्या विहिरीतील इलेक्ट्रिक मोटार चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन त्यांच्या ताब्यातून सुमारे ८० हजार रुपये किंमतीच्या दोन इलेक्ट्रिक मोटारी जप्त करण्यात MIDC पैठण पोलिसांना यश आले आहे.
पोलीस ठाणे MIDC पैठण हद्दीतील ईसारवाडी येथील शेतकरी जगन्नाथ गंजाजी बोबडे यांच्या शेतातील ३ एचपी क्षमतेची पारसमणी कंपनीची इलेक्ट्रिक मोटार अज्ञात चोरट्यांनी विहिरीतून काढून चोरून नेल्याची घटना २० मे २०२६ रोजी घडली होती. याबाबत MIDC पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना गोपनीय माहितीदारामार्फत आरोपींची माहिती मिळाली. त्यानुसार आत्माराम सखाराम जगदाळे, प्रभाकर बाबुराव बर्डे (दोघे रा. धनगाव, ता. पैठण), गंगाराम रामनाथ माळी (रा. बोरगाव, ता. पैठण) आणि तुळशीराम दिलीप गायकवाड (रा. ईसारवाडी, ता. पैठण) यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली.
चौकशीदरम्यान आरोपींनी दोन इलेक्ट्रिक मोटारी चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांच्या ताब्यातून ८० हजार रुपये किंमतीच्या दोन इलेक्ट्रिक मोटारी जप्त करण्यात आल्या.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोरे, पोहेकॉ. मोहतमल व पोकॉ. घोडके यांनी केली.

