महाराष्ट्र न्यूज टाईम्ससाठी बातमी:
छत्रपती संभाजीनगर, दि. ६ जून – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या सापळा कारवाईत मुकुंदवाडी पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याला १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणात एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाविरोधातही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
तक्रारदाराविरोधात दाखल करण्यात आलेल्या अर्जावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी तसेच गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात सुरुवातीला ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली.
तक्रारीची पडताळणी पंचांसमक्ष करण्यात आली असता, पोलीस अंमलदार गोकुळ अनिलराव खटावकर यांनी ५० हजार रुपयांच्या मागणीची पुष्टी केली. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय नागुसिंग बहुरे यांनी तडजोडीअंती १० हजार रुपये स्वीकारण्यास प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर ५ जून रोजी मुकुंदवाडी पोलीस ठाणे परिसरात एसीबीने सापळा रचला. तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर गोकुळ खटावकर यांना पंचांसमक्ष ताब्यात घेण्यात आले. आरोपीच्या अंगझडतीत एक मोबाईल फोनही जप्त करण्यात आला असून त्याचे तांत्रिक विश्लेषण सुरू आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष तिगोटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक वाल्मीक कोरे करीत आहेत.
सदर कारवाईला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे आणि पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
एसीबीने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कामासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी झाल्यास टोल फ्री क्रमांक 1064 किंवा व्हॉट्सॲप क्रमांक 7720891064 वर तात्काळ संपर्क साधावा.

