फुलंब्री 4जुन 2026(महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी- एस. के. शेख किनगावकर)
दैनिक ‘जगाचा जगमित्र’ चे संपादक संतोष भुनेकर यांच्यावर गुटखा माफियांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा टेंभूर्णी मराठी पत्रकार संघाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे. या प्रकरणी टेंभूर्णी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड यांना निवेदन देऊन संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, अवैध गुटखा विक्रीसारख्या बेकायदेशीर व्यवसायांचे वृत्तांकन केल्यामुळे पत्रकारांवर हल्ले होणे ही अत्यंत गंभीर बाब असून हा केवळ एका पत्रकारावरील नव्हे तर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर झालेला हल्ला आहे. पत्रकारांना निर्भयपणे काम करता यावे यासाठी हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संघाच्या वतीने करण्यात आली. महाराष्ट्रात पत्रकारांवरील हल्ल्यांविरोधात पत्रकार संरक्षण कायद्याची तरतूद असून अशा गुन्ह्यांवर कठोर शिक्षेची व्यवस्था आहे.
यावेळी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला की, अवैध गुटखा विक्री करणाऱ्या माफियांवर तातडीने कारवाई न झाल्यास पत्रकार संघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड यांना निवेदन देताना सुनील भाले, रावसाहेब अंभोरे, पी. जी. तांबकर, नसीम शेख, संजय राऊत, गजानन देठे, बी. डी. सवडे, अलकेश सोमाणी, बालाजी शेवाळे, साबेर शेख, फकरुस कुरेशी, गजानन शेळके, सुनील जोशी, आशपाक शेख, आशिष पेठणे, इम्रान शेख, गफूर शेख, असद मिकन खान पठाण आदी पत्रकार उपस्थित होते.
महाराष्ट्र न्यूज टाईमचे संपादक दिनेश गायके यांनीही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत पत्रकारांवरील हल्ले थांबवण्यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी केली.
– महाराष्ट्र न्यूज टाईम

