
छत्रपती संभाजीनगर : विषारी, हातभट्टी किंवा अवैध दारूच्या सेवनामुळे डोळे, किडनी यांसारखे महत्त्वाचे अवयव निकामी होण्याबरोबरच अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपल्या परिसरात अवैध दारू निर्मिती, वाहतूक किंवा विक्री सुरू असल्यास त्वरित राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अवैध दारूमध्ये मिथेनॉलसारखी घातक रसायने मिसळली जाण्याचा धोका असून त्यामुळे अंधत्व किंवा मृत्यूही होऊ शकतो.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने नागरिकांच्या तक्रारींसाठी टोल-फ्री हेल्पलाईन 1800 233 9999, व्हॉट्सअॅप क्रमांक 8422001133 आणि दूरध्वनी क्रमांक 0240-2331060 उपलब्ध करून दिले आहेत. राज्यभरातील अवैध दारू व्यवसायाविरोधात जनसहभाग वाढवण्यासाठी ही यंत्रणा कार्यरत असून प्राप्त तक्रारींची पडताळणी करून कारवाई केली जाते.

