छत्रपती संभाजीनगर, दि. ४ जून (महाराष्ट्र न्यूज टाईम्स) – जिल्ह्यातील अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात ग्रामीण पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत ७६ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत ५ हायवा ट्रक, २ ट्रॅक्टर तसेच १९ ब्रास वाळू व मुरुम जप्त करण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत ३ जून रोजी गंगापूर, शिल्लेगाव, विरगाव, पैठण, अजिंठा, पिशोर आणि करमाड पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विशेष गस्त व नाकाबंदी करण्यात आली.
या मोहिमेदरम्यान बेकायदेशीरपणे वाळू व मुरुमाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी १५ ब्रास वाळू व ४ ब्रास मुरुम असा एकूण १९ ब्रास गौण खनिज साठा जप्त केला. याशिवाय अवैध वाहतुकीसाठी वापरले जाणारे ५ हायवा ट्रक आणि २ ट्रॅक्टरही ताब्यात घेण्यात आले.
जप्त मुद्देमाल
गौण खनिज (वाळू व मुरुम) : १९ ब्रास (किंमत सुमारे ₹९१ हजार)
वाहने : ५ हायवा व २ ट्रॅक्टर (किंमत सुमारे ₹७६ लाख)
एकूण मुद्देमाल : ₹७६.९१ लाख
जप्त वाहने संबंधित पोलीस ठाण्यांच्या ताब्यात देण्यात आली असून संबंधितांविरुद्ध बीएनएस व गौण खनिज कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच वाहनांचे परवाने रद्द करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहेत.
पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी अवैध वाळू उपसा, मुरुम वाहतूक आणि इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधात कठोर भूमिका घेतली असून, अशा प्रकारच्या सरप्राईज राऊंड्स आणि धडक कारवाया पुढेही सुरू राहतील, असा इशारा दिला आहे.

