छत्रपती संभाजीनगर, दि. ३ जून : दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या पेवर ब्लॉक कामाचे बिल मंजूर करून धनादेश (चेक) काढून देण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) विजय पिराजी जोंधळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले.
मिळालेल्या माहितीनुसार, ४३ वर्षीय तक्रारदाराने मौजे रेल कनकावती नगर येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत पेवर ब्लॉकचे काम पूर्ण केले होते. या कामाचे सुमारे ८ लाख २० हजार रुपयांचे बिल मंजूर करून त्याचा चेक काढून देण्यासाठी आरोपी ग्रामसेवकाने ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर ३ जून रोजी पंचासमक्ष मागणीची पडताळणी करण्यात आली. पडताळणीत आरोपीने ४० हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर ग्रामपंचायत कार्यालय, मकरनपूर (ता. कन्नड) येथे सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने आरोपीला पंचांसमक्ष ताब्यात घेतले.
कारवाईदरम्यान आरोपीकडून ४० हजार रुपयांची लाच रक्कम आणि वन प्लस कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण सुरू आहे. आरोपीच्या निवासस्थानी घरझडतीची प्रक्रिया देखील सुरू असल्याची माहिती एसीबीने दिली.
ही कारवाई पोलीस निरीक्षक शांतीलाल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक भास्कर नवले करीत आहेत.
📞 एसीबीचे आवाहन
कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.
टोल फ्री क्रमांक : 1064
व्हॉट्सॲप हेल्पलाईन : 7720891064

