दोन दिवसांत दुसरी धडक कारवाई; चुकीच्या ब्रँडिंगमुळे 36 हजारांहून अधिक बाटल्या ताब्यात
छत्रपती संभाजीनगर, ता. २ (प्रतिनिधी) : मा. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) छत्रपती संभाजीनगर येथे मोठी कारवाई करत करोडी परिसरातील मे. एफडीसी लिमिटेडच्या गोदामातून सुमारे 20 लाख 78 हजार 676 रुपयांचे ‘एनर्जल’ (ENERZAL) पेय जप्त केले. दोन दिवसांत करण्यात आलेली ही दुसरी मोठी कारवाई असून अन्न सुरक्षा विभागाने नियमभंग करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने मंगळवारी (ता. २) करोडी येथील मे. एफडीसी लिमिटेड कंपनीच्या गोदामाची तपासणी केली. यावेळी ‘आरटीएस फ्रूट बेव्हरेज एनर्जी अँड इलेक्ट्रोलाइट (ENERZAL)’ या पेयाच्या ४०० मिली क्षमतेच्या एकूण ३६ हजार ४६८ बाटल्या साठवून ठेवण्यात आल्याचे आढळून आले. तपासणीदरम्यान संबंधित उत्पादनाच्या लेबलिंग व ब्रँडिंगमध्ये त्रुटी असल्याचे निदर्शनास आले.
अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (FSSAI) यांच्या पत्रानुसार सदर उत्पादन ‘मिसब्रँडेड’ अर्थात चुकीचे लेबलिंग किंवा ब्रँडिंग असलेले असल्याचे स्पष्ट झाल्याने प्रशासनाने तात्काळ कारवाई करत संपूर्ण साठा जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या मालाची एकूण किंमत रु. 20,78,676 इतकी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी पी. एस. कुचेकर व पी. पी. सुरसे यांनी केली. सहायक आयुक्त डी. व्ही. पाटील तसेच सहआयुक्त एस. आर. करकले यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
अन्न व औषध प्रशासनाने ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादक, वितरक व विक्रेत्यांवर भविष्यातही अशाच कठोर कारवाया सुरू राहणार असल्याचा इशाराही विभागाने दिला आहे.
चौकट
दोन दिवसांत दोन मोठ्या कारवाया
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने गेल्या दोन दिवसांत सलग दोन मोठ्या कारवाया करून नियमभंग करणाऱ्यांवर वचक निर्माण केला आहे. प्रतिबंधित व नियमबाह्य अन्नपदार्थांविरोधातील मोहिम अधिक तीव्र करण्यात आली असून ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तपासण्या वाढविण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.

