शेतवस्तीवर घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; १.३१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
छत्रपती संभाजीनगर, दि. १ जून २०२६ (प्रतिनिधी)
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने शेतवस्तीवरील घरफोडी प्रकरणाचा यशस्वी छडा लावत एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून सुमारे १ लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपीनाथ माणिक मोरे (वय ४४, रा. विहामांडवा, ता. पैठण) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १८ ते १९ एप्रिल २०२६ दरम्यान शिवाजीनगर शिवारातील त्यांच्या शेतवस्तीवरील घरात चोरी झाली होती. चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा सुमारे ९५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता.
या प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तपास करत असताना गोपनीय माहितीच्या आधारे बुध्या उर्फ मझल्या भोसले (वय ४५, रा. टाकळी अंबड, ता. पैठण) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने आपल्या साथीदार राजेश उर्फ हिंदवाला दिलीप पवार (रा. बाळुंज) याच्यासह चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपीकडून सोन्याचे दागिने, मोबाईल फोन तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली मोटारसायकल असा एकूण १ लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक महेश युगे, सचिन राठोड, सुनील गोरे, बाळवीरसिंग बडे, शिवाजी नगरे, योगेश तरसळे आणि जीवन चोलप यांचा सहभाग होता.

