छत्रपती संभाजीनगर : २६मे ( महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)
पैठण एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई करत कत्तलीसाठी आणून ठेवलेल्या तब्बल २ लाख २५ हजार रुपये किंमतीच्या ७ गोवंश जनावरांची सुटका केली आहे. या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस ठाणे हद्दीतील ढोरकीन शिवारात इलियास अब्दुल शेख यांच्या शेतात गोवंश जातींची जनावरे कत्तलीसाठी आणून डांबून ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती सपोनि ईश्वर जगदाळे यांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे सपोनि जगदाळे यांनी तात्काळ विशेष पथक तयार करून संबंधित ठिकाणी छापा टाकला. कारवाईदरम्यान २ लाख २५ हजार रुपये किंमतीची ७ गोवंश जातींची जनावरे आढळून आली. पोलिसांनी तत्काळ जनावरांची सुटका केली.
या प्रकरणी आरोपी इलियास शेख यास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरोधात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. प्रकाश जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत स्वामी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत सपोनि ईश्वर जगदाळे यांच्यासह पोलीस अंमलदार राहुल मोहतमल, ज्ञानेश्वर भवर, अमित घोडके, कृष्णा उगले तसेच होमगार्ड श्रीकांत त्रिभुवन, विष्णू शिंदे, किरण वाल्हेकर आणि वाल्मिक घोंगडे यांनी सहभाग घेतला.

