छत्रपती संभाजीनगर, दि.२५ मे (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)- राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत कार्यरत असलेली वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था, नागपूर (वनार्टी)तर्फे २०२६-२८ या शैक्षणिक सत्रासाठी जेईई, नीट आणि एमएचटी-सीईटी परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास दि.१५ जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे,असे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे यांनी कळविले आहे. राज्यातील विमुक्त जाती तसेच भटक्या जमाती ब, क व ड नॉन-क्रिमीलेअर प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी वनार्टी ही संस्था कार्य करीत आहे.
सन २०२६-२८ या शैक्षणिक सत्रासाठी ‘वनार्टी’तर्फे जेईई, नीट आणि एमएचटी-सीईटी परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाणार आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांतील पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांचे अर्ज ‘वनार्टी’च्या www.vanarti.in या संकेतस्थळावर मागविण्यात आले आहेत. अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत ३० मे २०२६ निश्चित करण्यात आली होती. मात्र, विद्यार्थ्यांनी ‘वनार्टी’च्या ७८८७८८२०२६ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या मोठ्या प्रतिसादाची दखल घेत आता अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ जून २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे,असे कळविण्यात आले आहे.

