पोलीस आयुक्तालयात मुस्लिम धर्मगुरू, मौलाना व शांतता समिती सदस्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
छत्रपती संभाजीनगर २५मे बकरी ईद पार्श्वभूमीवर शहरात शांतता व सौहार्द राखण्याचे आवाहन
पोलीस आयुक्तालयात मुस्लिम धर्मगुरू, मौलाना व शांतता समिती सदस्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
छत्रपती संभाजीनगर : आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता, सौहार्द आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष पुढाकार घेत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली. पोलीस आयुक्त कार्यालयात आयोजित या बैठकीत शहरातील प्रमुख मुस्लिम धर्मगुरू, मौलाना, शांतता समिती सदस्य, लोकप्रतिनिधी तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बकरी ईद सण शांततेत आणि सामाजिक सलोखा जपत साजरा करण्याचे आवाहन केले. कोणत्याही प्रकारे शहरात अस्वच्छता निर्माण होणार नाही, सार्वजनिक ठिकाणी घाण पसरवली जाणार नाही तसेच इतर समाजाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले.
बैठकीत विशेषतः प्राण्यांच्या कत्तलीसंदर्भात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे सांगण्यात आले. महानगरपालिकेने निश्चित केलेल्या जागांमध्येच कुर्बानी करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून उघड्यावर मांस विक्री अथवा कत्तल टाळण्याचे आवाहन करण्यात आले. बंदी असलेल्या जनावरांची कत्तल केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला.
तसेच सोशल मीडियावर अफवा, भडक संदेश किंवा समाजात दहशत निर्माण करणारे पोस्ट प्रसारित करू नयेत, असे स्पष्ट करण्यात आले. कोणतीही अनुचित घटना घडल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले असून नागरिकांनी एकमेकांच्या भावना जपत सण साजरा करावा, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.
शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून विविध भागात विशेष पथके, फिक्स पॉइंट आणि चेक पोस्ट उभारण्यात येणार असल्याची माहितीही प्रशासनाने दिली.
या बैठकीमुळे बकरी ईद सण शांततेत, सौहार्दपूर्ण वातावरणात आणि सामाजिक एकोपा जपत साजरा करण्याचा सकारात्मक संदेश शहरभर पोहोचला आहे.

