छत्रपती संभाजीनगर : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता आणि सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी शहर पोलिस प्रशासनाकडून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. शहर पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या उपस्थितीत शहरातील मुस्लिम धर्मगुरूंसोबत बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीत बकरी ईद निमित्त गोवंशीय जनावरांची कुर्बाणी न करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले. या आवाहनाला मुस्लिम धर्मगुरूंनी सकारात्मक प्रतिसाद देत शहरात गोवंशीय जनावरांची कुर्बाणी होणार नसल्याचे आश्वासन दिले.
तसेच मुस्लिम समाजातील नागरिकांनी कायद्याचे पालन करून सामाजिक ऐक्य जपावे आणि गोवंशीय जनावरांची कुर्बाणी करू नये, असे आवाहन धर्मगुरूंनी समाजबांधवांना केले. जर कोणी नियमांचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न केला, तर त्यासाठी संबंधित व्यक्ती स्वतः जबाबदार असेल, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
शहरात शांतता, सलोखा आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासन आणि मुस्लिम धर्मगुरूंनी एकत्रितपणे सकारात्मक भूमिका घेतल्याचे या बैठकीतून दिसून आले.

