छत्रपती संभाजीनगर, दि. २३ मे : शहरातील मुख्य नाल्यांवर परवानगी घेऊन उभारण्यात आलेल्या इमारतींमुळे नालेसफाईच्या कामात मोठे अडथळे निर्माण होत असून, पावसाळी व्यवस्थापनावर गंभीर परिणाम होत असल्याची दखल घेत अशा इमारतींना वाढीव कर आकारण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच नाल्यांमध्ये थेट ड्रेनेज सोडणाऱ्या नागरिकांविरोधात विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
आयुक्त अमोल येडगे यांनी २२ मे रोजी शहरातील प्रमुख नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी करून नालेसफाई कामाचा आढावा घेतला. कबाडीपुरा येथून या पाहणीची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर बारूदगर नाला, संभाजीपेठ तसेच रोपळेकर चौक परिसरातील मुख्य नाल्यांची पाहणी करून साफसफाई, अतिक्रमण आणि पाणी निचरा व्यवस्थेची माहिती घेतली.
पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी मुख्य नाल्यांवर मोठ्या प्रमाणात बांधकामे उभारण्यात आल्याचे निदर्शनास आले. संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असता, या इमारतींना अधिकृत परवानगी देण्यात आल्याचे स्पष्ट झाले. मात्र अशा बांधकामांमुळे नाल्यांच्या स्वच्छतेच्या कामात मोठ्या अडचणी निर्माण होत असल्याचे आयुक्तांनी नमूद केले. नाल्यांवर बांधलेल्या इमारतींच्या खालच्या भागात कचरा साचून राहतो, त्यामुळे नालेसफाई पूर्ण क्षमतेने करता येत नाही. परिणामी पावसाळ्यात पाण्याचा निचरा अडथळला जाऊन पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढतो. या पार्श्वभूमीवर नाल्यांवर बांधकाम केलेल्या इमारतींना वाढीव कर आकारण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
यावेळी शहरातील काही भागांत घरगुती व व्यावसायिक ड्रेनेज लाईन थेट नाल्यांमध्ये सोडण्यात आल्याचे प्रकारही समोर आले. त्यामुळे नाल्यांमध्ये सांडपाणी मिसळून दुर्गंधी पसरते तसेच नाल्यांची नैसर्गिक वहनक्षमता कमी होत असल्याचे आयुक्तांनी सांगितले. अतिवृष्टीच्या काळात नाले ओसंडून वाहण्याचा धोका वाढत असल्याने संबंधित नागरिकांना नोटिसा बजावून त्यांचे ड्रेनेज एसटीपीशी जोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी विशेष मोहीम राबवून कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
“शहरातील नाले हे केवळ पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी आहेत. त्यामध्ये थेट सांडपाणी सोडल्यास नाल्यांची क्षमता कमी होते आणि पर्यावरणीय तसेच सार्वजनिक आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे अशा प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी प्रशासन कठोर भूमिका घेणार आहे,” असे आयुक्त अमोल येडगे यांनी सांगितले.
पाहणीदरम्यान कबाडीपुरा येथील महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रालाही त्यांनी भेट देऊन सुविधांचा आढावा घेतला. तसेच रोपळेकर चौक परिसरात पाण्याची पाईपलाईन जमिनीवर आल्याचे निदर्शनास येताच संबंधित ठेकेदाराशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून ती पाईपलाईन तातडीने जमिनीखाली टाकण्याचे निर्देश दिले.
शहरातील पावसाळी पूर्वतयारी, नालेसफाई, अतिक्रमण नियंत्रण आणि पाणी निचरा व्यवस्थेच्या कामांमध्ये कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नाही, असा इशाराही आयुक्तांनी यावेळी दिला.
या पाहणीदरम्यान शहर अभियंता संजय कोंबडे, वॉर्ड अभियंता काझी जावेद, किरण तमनर, जनसंपर्क अधिकारी तौसीफ अहमद आदी उपस्थित होते.

