छत्रपती संभाजीनगर : शहरातील सार्वजनिक रस्त्यांवर अतिक्रमण करून रेती, खडी, विटा व बांधकाम साहित्य साठवणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध महानगरपालिकेने धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त केले. या कारवाईत दोन हायवा भरून साहित्य जप्त करण्यात आल्याने अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.
महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशान्वये तसेच मुख्य अतिक्रमण नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे व उपायुक्त सविता सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलन पथकाने ही विशेष मोहीम राबवली.
या कारवाईअंतर्गत किराडपुरा येथील राम मंदिर रोड परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अतिक्रमण करून ठेवण्यात आलेल्या रेती, खडी व विटांच्या साठ्यांवर कारवाई करण्यात आली. तसेच एन-७ सिडको परिसरातील साखरे मंगल कार्यालय आणि गुलाब विश्व कार्यालय रोड परिसरातही रस्त्यालगत टाकण्यात आलेल्या बांधकाम साहित्याविरुद्ध मोहीम राबविण्यात आली.
कारवाईदरम्यान रस्त्यावर अडथळा निर्माण करणारे रेती, खडी, विटा, बांधकाम साहित्य तसेच कचरा जप्त करण्यात आला. जप्त साहित्य दोन मोठ्या हायवामधून वाहतूक करून गरवारे स्टेडियम येथे जमा करण्यात आले.
शहरातील रस्ते वाहतुकीसाठी मोकळे ठेवणे, नागरिकांची गैरसोय टाळणे आणि सार्वजनिक जागांचा योग्य वापर सुनिश्चित करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. सार्वजनिक रस्त्यांवर बांधकाम साहित्य टाकून अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध भविष्यातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशाराही मनपाने दिला आहे.
ही कारवाई इमारत निरीक्षक रवींद्र देसाई, सागर श्रेष्ठ तसेच नागरी मित्र पथकाच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडली. मनपाच्या या धडक मोहिमेमुळे संबंधित परिसरातील रस्ते मोकळे होऊन वाहतुकीला मोठा दिलासा मिळाला आहे.
— महाराष्ट्र न्यूज टाईम प्रतिनिधी

