फुलंब्री 24 मे 2026 (एस.के.शेख महाराष्ट्र न्यूज टाईम प्रतिनिधी)किनगाव येथे हवालदार संजय लाला शिंदे यांचा सेवानिवृत्ती समारोह उत्साहात संपन्न
फुलंब्री तालुक्यातील आदर्श गाव किनगाव येथील सुपुत्र तथा भारतीय सैन्यात हवालदार पदावर कार्यरत असलेले संजय लाला शिंदे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त गावात भव्य सत्कार व सेवानिवृत्ती समारोह उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
देशसेवेची गौरवशाली कारकीर्द पूर्ण करून गावी परतलेल्या संजय शिंदे यांचे ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी गावातून मिरवणूक काढण्यात आली असून देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
या कार्यक्रमास गावातील आजी-माजी सैनिक, प्रतिष्ठित नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास अभियंता श्री अतुल चव्हाण साहेब, श्री तेजराव पाटील चव्हाण, श्री नंदकिशोर देवकर, सुभेदार अभिमन्यू सोनवणे यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.
उपस्थित मान्यवरांनी संजय शिंदे यांच्या देशसेवेबद्दल गौरवोद्गार काढत, सैन्य दलातील जवानांचे योगदान हे राष्ट्रासाठी अभिमानास्पद असल्याचे सांगितले. कठोर परिस्थितीत देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांमुळेच नागरिक सुरक्षित जीवन जगत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
गावातील युवकांनीही सैन्य दलात भरती होऊन देशसेवेचा आदर्श घ्यावा, असा प्रेरणादायी संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. संजय शिंदे यांच्या सेवानिवृत्ती समारोहामुळे संपूर्ण गावात अभिमान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

