वैजापूर तालुक्यातील पाराळा येथे शेतकऱ्यांना डिझेलसाठी ताटकळत ठेवून विना नंबर हायवाला २५ हजार रुपयांचे डिझेल दिल्याचा आरोप
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी कृषी कामांसाठी डिझेल मिळवण्यासाठी अक्षरशः हैराण झाले असताना वैजापूर तालुक्यातील पाराळा येथील एका पेट्रोल पंपावरील मनमानी कारभारामुळे शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शेतकऱ्यांना “एक हजार किंवा दोन हजार रुपयांपर्यंतच डिझेल मिळेल” अशी सक्ती केली जात असल्याचा आरोप होत असतानाच, त्याच पंपावर एका विना नंबर हायवा वाहनाला तब्बल २५ हजार रुपयांचे डिझेल देण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दिवसभर ट्रॅक्टर व कृषी कामांसाठी डिझेल घेण्यासाठी रांगेत उभे राहूनही त्यांना “लाईट नाही”, “सोलरवर मशीन चालते”, “मर्यादित डिझेल उपलब्ध आहे” अशी कारणे सांगून डिझेल देण्यास टाळाटाळ केली जाते. मात्र दुसरीकडे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांना कोणतीही अडचण न दाखवता मोठ्या प्रमाणावर डिझेल पुरवठा केला जात असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
विशेष म्हणजे संबंधित हायवा वाहनाला नंबर प्लेट नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून, अशा वाहनाला इतक्या मोठ्या प्रमाणावर डिझेल पुरवठा कसा करण्यात आला? असा सवाल परिसरातून उपस्थित होत आहे. “शेतकऱ्यांसाठी वेगळे नियम आणि अवैध धंदे करणाऱ्यांसाठी वेगळे नियम आहेत का?” असा संतप्त प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच संबंधित पेट्रोल पंपावर प्रशासनाकडून पंचनामा करण्यात आला होता. या पंचनाम्यावर तब्बल २५० हून अधिक शेतकऱ्यांच्या सह्या असल्याचे सांगितले जात आहे. पंपावर पिण्याच्या पाण्याची सुविधा नसणे, शौचालयांची दुरवस्था, परिसरात प्रचंड धूराळा, सीसीटीव्ही कॅमेरे नसणे अशा अनेक गंभीर बाबींचा उल्लेख पंचनाम्यात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. संबंधित पेट्रोल पंप चालक व विना नंबर हायवा चालकावर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी आता शेतकरी वर्गातून होत आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
खरीप हंगामात शेतकऱ्यांना डिझेलसाठी वणवण; पाराळा येथील पेट्रोल पंपाविरोधात संताप
Related Posts
Add A Comment

