छत्रपती संभाजीनगर :
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर (GECA) येथील गेल्या काही वर्षांतील विकासकामे, शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी आणि परिसर सुशोभीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रशासनिक मंडळातील सदस्यांचा सत्कार समारंभ व स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दिनांक २२ मे २०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेच्या (GECA Alumni Association) वतीने आयोजित या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी विशेष योगदान देणारे श्री. प्रसाद कोकीळ, श्री. मुकुंद कुलकर्णी, श्री. संजीव देशमुख, श्री. सुरज डुमणे आणि श्री. संजय डोंगरे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. अलीकडील काळात महाविद्यालयात ऑडिटोरियम, आधुनिक अॅक्टिव्हिटी सेंटर्स, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचा शैक्षणिक प्रक्रियेत सहभाग, परिसर विकास आणि विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधा निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात आला. त्यामुळे महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा अधिक उंचावण्यास मदत झाली आहे.
१९६० साली सुरू झालेल्या या प्रतिष्ठित महाविद्यालयाने आजपर्यंत हजारो गुणवंत अभियंते घडविले असून देश-विदेशात विविध क्षेत्रांमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी कार्यरत आहेत. महाविद्यालय आणि माजी विद्यार्थी यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटना अधिक सक्रिय करण्याचाही मानस व्यक्त करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास माजी विद्यार्थी, उद्योजक, प्राध्यापक, विद्यार्थी व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून हा कार्यक्रम एक आनंददायी कौटुंबिक स्नेहमेळावा ठरणार आहे. आयोजकांनी सर्व माजी विद्यार्थ्यांनी सहकुटुंब उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन उद्योजक विवेक देशपांडे, उमेश दाशरथी, प्रशांत देशपांडे, माजी आमदार श्रीकांत जोशी तसेच माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष किरण चव्हाण यांच्या वतीने करण्यात आले आहे.

