छत्रपती संभाजीनगर
दि.१९ मे महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी
शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत करणाऱ्या अनधिकृत नळ जोडण्यांविरोधात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने धडक कारवाई सुरू केली असून, मनपा आयुक्त श्री. अमोल येडगे यांच्या आदेशानुसार आज दि. १९ मे २०२६ रोजी उस्मानपुरा येथून शम्स नगर मधून देवानगरी कडे जाणाऱ्या मुख्य जलवाहिनी वरील विशेष मोहीम राबवून तब्बल ११४ अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दि. १३ मे रोजी आयुक्तांनी पाणी पुरवठा विभागाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली होती.
या बैठकीमध्ये सर्व अभियंते व कर्मचाऱ्यांना पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी कडक आदेश देण्यात आले. तसेच शहरातील मुख्य व वितरण जलवाहिन्यांवरील अनधिकृत नळ जोडण्या तात्काळ खंडित करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. अधिकृत नळ धारकांना पुरेसा आणि नियमित पाणी पुरवठा मिळावा, हा या मोहिमेमागील मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सदर कारवाई अतिरिक्त आयुक्त-२ श्रीमती कल्पिता पिंपळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत कार्यकारी अभियंता वसंत भोये आणि उप अभियंता किरण धांडे, पथक अभियंता श्री. रोहित इंगळे, शाखा अभियंता श्री. महेश चौधरी, कनिष्ठ अभियंता सुशिल कुलकर्णी, सचिन वसावी यांच्यासह मनपा कर्मचारी आणि नागरी सहाय्यक पथकाचा सक्रिय सहभाग होता.
महानगरपालिकेकडून शहरातील अनधिकृत नळ जोडण्यांविरोधातील कारवाई यापुढेही अधिक तीव्रपणे सुरू राहणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

