पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला मनपा प्रशासनाचा प्रतिसाद
छत्रपती संभाजीनगर, दि. 18 मे :(महाराष्ट्र न्यूज टाइम्स)
देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी आज सोमवार, दि. 18 मे रोजी शासकीय डिझेल वाहनांचा वापर टाळत पर्यावरणपूरक वाहतुकीचा अवलंब केला.
याअंतर्गत महापौर समीर राजूरकर हे इ-स्कूटरवरून महापालिका मुख्यालयात दाखल झाले, तर स्थायी समिती सभापती श्री अनिल मकरिये हे इ-कारने मनपात पोहोचले. मनपा आयुक्त श्री अमोल येडगे यांनी स्वतः सायकलवरून कार्यालयात येत इंधन बचत आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
आयुक्त अमोल येडगे यांनी यापूर्वीच आदेश जारी करून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोमवार, दि. 18 मे रोजी सायकल अथवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करून कार्यालयात येण्याच्या सूचना दिल्या होत्या. कोणत्याही अधिकाऱ्याने शासकीय वाहनाचा वापर करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते.
तसेच ज्या अधिकाऱ्यांना फिल्ड व्हिजिट करणे आवश्यक आहे, त्यांच्यासाठी आयुक्तांच्या पूर्वपरवानगीनंतर इ-कारची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले होते.
या आदेशाचे पालन करत अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील हे त्यांच्या अंगरक्षकासह दुचाकीवरून कार्यालयात आले. याशिवाय विविध विभागप्रमुखांनीही शासकीय वाहनांचा वापर टाळत स्वतःची वाहने, सायकल तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करून महापालिका मुख्यालयात हजेरी लावली.
या उपक्रमामुळे इंधन बचतीसह पर्यावरण संरक्षणाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला.

