छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी) – छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अंतर्गत खुलताबाद, वेरूळ, घृष्णेश्वर आणि कन्नड शहर येथे अद्ययावत सीसीटीव्ही निगराणी प्रकल्पाचे उद्घाटन 
उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला राज्याचे मंत्री अतुल सावे आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांची प्रमुख उपस्थिती होती.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच गुन्हेगारी प्रतिबंधासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले. अत्याधुनिक आणि उच्च दर्जाच्या कॅमेऱ्यांद्वारे प्रमुख चौक, बाजारपेठा, धार्मिक स्थळे आणि मुख्य रस्त्यांवर २४ तास नजर ठेवली जाणार आहे.
विशेषतः जागतिक वारसा स्थळ असलेल्या वेरूळ लेणी आणि घृष्णेश्वर मंदिर परिसरात देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही यंत्रणा उपयुक्त ठरणार असून, संशयित हालचालींवर लक्ष ठेवणे आणि गुन्ह्यांचा तपास जलदगतीने करणे अधिक सोपे होणार आहे.
या सीसीटीव्ही प्रणालीमुळे महिला सुरक्षा, वाहतूक नियंत्रण आणि आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देणे शक्य होणार आहे. ही यंत्रणा थेट पोलीस नियंत्रण कक्षाशी जोडण्यात आली असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, पोलीस अधिकारी, प्रशासनातील अधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

