

छत्रपती संभाजीनगर, दि. 12 मे : संभाजीपेठ येथील सावित्रीबाई फुले भाजी मार्केटचा गेल्या तब्बल 14 वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागला असून स्थायी समितीचे सभापती अनिल मकरीये यांच्या पुढाकारामुळे या भाजी मार्केटच्या उभारणीचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. त्यामुळे येथील ओटेधारक, गाळेधारक तसेच भाजी विक्रेता व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सावित्रीबाई फुले भाजी मार्केटचा प्रश्न अनेक वर्षांपासून रखडलेला असल्यामुळे येथील भाजी विक्रेत्यांना अस्थायी भाजी मंडईत व्यवसाय करताना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. कायमस्वरूपी आणि सुसज्ज जागा उपलब्ध व्हावी, अशी व्यापाऱ्यांची दीर्घकालीन मागणी होती. या पार्श्वभूमीवर स्थायी समिती सभापती अनिल मकरीये यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत सातत्याने पाठपुरावा करून हा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावला.
सध्या भाजी मार्केटच्या बांधकामाचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच ते पूर्ण होणार आहे. यासंदर्भात ओटेधारक आणि गाळेधारक व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीदरम्यान सर्व व्यापाऱ्यांना प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच पुढील आठवड्यात संबंधित गाळेधारकांना अधिकृतरित्या गाळ्यांचे अनावरण करून ताबा देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
गाळे वाटप प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे येत्या शुक्रवारपर्यंत जमा करण्याच्या सूचना सर्व भाजी विक्रेत्यांना करण्यात आल्या आहेत. प्रशासनाकडून ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
यावेळी शहर अभियंता संजय कोंबडे, मालमत्ता अधिकारी संजय चामले, विधी अधिकारी अपर्णा थेटे, विकास पाटील ग्रुपचे आत्माराम पाटील तसेच मोठ्या संख्येने भाजी विक्रेते आणि व्यापारी उपस्थित होते.
या निर्णयामुळे संभाजीपेठ परिसरातील भाजी विक्रेत्यांना हक्काची जागा मिळणार असून नागरिकांनाही अधिक सुसज्ज आणि व्यवस्थित भाजी मार्केटची सुविधा उपलब्ध होणार आहे.

