
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अंतर्गत राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमाच्या अनुषंगाने दिनांक २५ एप्रिल २०२६ रोजी “जागतिक हिवताप दिन” उत्साहात साजरा करण्यात आला.
या निमित्ताने नागरी हिवताप योजनेअंतर्गत संपूर्ण शहरात विविध सार्वजनिक ठिकाणी कीटकजन्य आजारांविषयी जनजागृती व प्रतिबंधासाठी विशेष प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे. ही प्रदर्शने दिनांक २५ एप्रिल २०२६ ते ९ मे २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येत असून, नागरिकांना हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया आदी आजारांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, स्वच्छतेचे महत्त्व तसेच प्रभावी प्रतिबंधात्मक मार्गदर्शन करण्यात येत आहे.
सदर उपक्रम महापौर मा. श्री. समीर राजूरकर, उपमहापौर मा. श्री. राजेंद्र जंजाळ, विरोधीपक्ष नेता मा. श्री. समीर साजिद, सभापती स्थायी समिती मा. श्री. अनिल मकरिये, सभापती वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समिती मा. डॉ. श्रीमती सुनिता संजय सोळुंके तसेच मा. आयुक्त श्री. अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत आहे.
या अंतर्गत शहरातील मध्यवर्ती बसस्थानक, सिडको बसस्थानक, रेल्वे स्थानक, एन-२ कम्युनिटी ग्राउंड आदी प्रमुख ठिकाणी प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले असून, इतर भागांमध्येही ही प्रदर्शने टप्प्याटप्प्याने आयोजित करण्यात येणार आहेत.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये कीटकजन्य व साथरोगांविषयी व्यापक जनजागृती निर्माण करणे हा आहे. नागरिकांनी या प्रदर्शनांना भेट देऊन साथरोग विषयक माहितीचा लाभ घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी केले आहे.

