छत्रपती संभाजीनगर, दि. ३ (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी):
मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील कर्करोग रुग्णांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालय छत्रपती संभाजीनगर हे उपचाराचे विश्वासार्ह केंद्र ठरत असून, दर्जेदार आणि सुलभ सेवेमुळे या रुग्णालयाचा लौकीक दिवसेंदिवस वाढत आहे. कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी हे रुग्णालय खऱ्या अर्थाने आशेचा किरण बनले आहे.
रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे आणि विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली येथे आधुनिक सुविधा व दर्जेदार उपचार उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यांच्या नियोजनामुळे अनेक रुग्ण उपचारानंतर निरोगी होऊन आपल्या कुटुंबात परतत असल्याचे समाधान व्यक्त केले जात आहे.
स्थापना व प्रगतीचा प्रवास
सन १९८४ मध्ये किरणोपचार विभागाने सुरुवात झालेल्या या रुग्णालयाने सातत्याने प्रगती करत अत्याधुनिक कर्करोग उपचार केंद्राचा दर्जा मिळवला आहे. २०१२ मध्ये अधिकृत उद्घाटनानंतर येथे पॅथॉलॉजी, रेडिओ डायग्नोसिस, किमोथेरपी, किरणोपचार यांसारख्या सुविधा सुरू करण्यात आल्या.
२०१५ मध्ये टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई यांच्याशी सामंजस्य करार झाल्यामुळे उपचार अधिक जलद आणि सुलभ झाले. २०१६ मध्ये राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा मिळाल्यानंतर रुग्णालयाचा आणखी विस्तार झाला.
अत्याधुनिक सुविधा व सेवा
सध्या रुग्णालयात खालील अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत:
लीनियर अॅक्सिलरेटर, ब्रॅकीथेरपी
१२८ स्लाइस सीटी स्कॅन
रोबोटिक सर्जरी युनिट (२०२५)
पॅलिअटिव्ह मेडिसिन विभाग
डिजिटल मॅमोग्राफी सुविधा
३०० खाटांची विस्तारित इमारत
ग्रामीण आणि शहरी भागात कर्करोग जनजागृती व स्क्रिनिंग मोहिमा राबवून लवकर निदानावरही भर दिला जात आहे.
रुग्णसेवेची ठळक आकडेवारी (२०१२ – मार्च २०२५)
ओपीडी रुग्ण: ४.४२ लाख
आयपीडी रुग्ण: ६३,२९८
मोठ्या शस्त्रक्रिया: ११,४०४
लहान शस्त्रक्रिया: ११,३८४
केमोथेरपी: १.२४ लाख
आयसीयू रुग्ण: ९,५३०
गरीब रुग्णांसाठी दिलासा
आयुष्मान भारत योजना आणि महात्मा फुले जनआरोग्य योजना यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोफत किंवा सवलतीत उपचार मिळत आहेत. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने रुग्ण व नातेवाईकांसाठी निवास व भोजनाची सुविधाही उपलब्ध आहे.
भविष्यातील योजना
रुग्णालयात प्रिव्हेन्टीव्ह ऑन्कोलॉजी अभ्यासक्रम, मॉलिक्युलर प्रयोगशाळा आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिट सुरू करण्याचे नियोजन आहे. सध्या मंजूर ७१९ पदांपैकी ५२९ पदे कार्यरत असून उर्वरित पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.



