छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)| दि. ३ : ६१ व्या फेमिना मिस इंडिया सौन्दर्य स्पर्धेत प्रथम उपविजेत्या कु.राजनंदिनी सोनाली मंगलसिंग पवार” यांनी बीड बायपास येथील भगवान बाबा बालिका अनाथ आश्रमात सामाजिक व सेवा भावनेने अनाथ मुलींची भेट घेऊन रविवारी अन्नदान केले. यावेळी आश्रमतील अनाथ मुलींशी त्यांनी दिलखुलास संवाद साधला.
प्रथमच ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर मध्ये आगमन झाल्यानंतर भगवान बाबा आश्रमाच्या संचालिका कविता वाघ यांनी राजनंदिनी पवार, आई सोनाली पवार, आणि वडील मंगलसिंग पवार यांचे स्वागत केले. यावेळी बोलतांना राजनंदिनी पवार म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणेने आणि विचारांनी मी आपल्या शहराचे, राज्याचे प्रतिनिधित्व देशपातळीवर करू शकले. आणि हे सर्व आपल्या सर्वांच्या सहकार्य आणि प्रेमामुळे शक्य झाले. आपण अनाथ असल्याची भावना मनात न ठेवता समाजातील गोर- गरिबांसाठी चांगले काम करण्याची वृत्ती मनात ठेवा. यामुळे अनेकांना तुमच्या मदतीचा हात मिळू शकेल. माझ्यासारखे तुम्हीही होऊ शकता असा आत्मविश्वास अनाथ मुलींमध्ये निर्माण करून जिद्द, आणि मेहनत करा, यश तुम्हाला नक्की मिळेल असा विश्वास यावेळी राजनंदिनी पवार यांनी अनाथ मुलींमध्ये व्यक्त केला. अजूनही मला जिंकण्यासाठी अनेक स्पर्धेत सहभागी व्हायचे असून तुमच्या सर्वांची साथ आणि माझ्यावर असलेले प्रेम कायम असू द्या अशी भावनिक साद यावेळी फेमिना मिस इंडिया सौन्दर्य स्पर्धेत प्रथम उपविजेत्या कु.राजनंदिनी सोनाली मंगलसिंग पवार” यांनी भगवान बाबा बालिका आश्रमतील मुलींना घातली. यावेळी सारिका घुगे, डीडब्लू फाउंडेशनच्या अध्यक्षा कोमल नारायण, मीडिया समन्वयक सचिन लिला सुखदेव अंभोरे, ऋषिकेश चिपटे यांची उपस्थिती होती.
“राजा शिवाजी” चित्रपट दाखवणार.
भगवान बाबा आश्रमातील अनाथ मुलींना भेटून मला खुप समाधान आणि आनंद वाटला. त्यांच्या चेहऱ्यावरची निरागस भावना बघून मलाही माझे बालपण आठवले. आपल्यासारखे त्यांनाही जगता यावे आणि काही क्षण साजरे करावे यासाठी सामाजिक सेवा भावनेतून येत्या काही दिवसात “राजा शिवाजी” या मराठी चित्रपटाच्या एका शो चे एक दिवस आयोजन करून छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार या अनाथ मुलींमध्ये रुजवण्याचा माझा संकल्प असून तो नक्की मी पूर्ण करणार असा शब्द त्यांनी दिला.


