छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)
“चला चला… बाजाराला चला…” अशा घोषणांनी परिसर दुमदुमला असताना, सर्वसामान्यांच्या उदरनिर्वाहाचा आधार असलेल्या आठवडी बाजार बंद करण्याच्या निर्णयाविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्या वतीने गांधी नगर येथील मोंढा रविवार बाजार परिसरात मोठ्या संख्येने जनआंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात स्थानिक नागरिक, व्यापारी आणि विक्रेत्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. “बिल्डरांच्या फायद्यासाठी गरीबांचा बाजार बंद करणे अन्यायकारक आहे,” असा आरोप आंदोलकांनी करत प्रशासनाच्या निर्णयाचा निषेध केला.
यावेळी प्रभाग क्रमांक ७ मधील नगरसेविका सुनिता मधुकर सोनवणे व राहुल कुमार मधुकर सोनवणे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “रविवार बाजार हा हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा मुख्य स्रोत आहे. हा बाजार बंद करण्याचा कोणताही निर्णय आम्ही सहन करणार नाही.”
आंदोलनादरम्यान प्रशासनाला इशारा देण्यात आला की, जर बाजार बंद करण्याचा निर्णय मागे घेतला नाही, तर यापुढे आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल.
स्थानिक विक्रेत्यांनीही आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की, “आमचा व्यवसाय बंद झाला तर आमच्यावर उपासमारीची वेळ येईल. प्रशासनाने त्वरित निर्णयाचा पुनर्विचार करावा.”
या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिस बंदोबस्तात परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात आली.





