छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र न्यूज टाइम्स| दि. २ : ओडिसातील भुवनेश्वर येथे संपन्न झालेल्या ६१ व्या फेमिना मिस इंडिया सौन्दर्य स्पर्धेत प्रथम उपविजेत्या ठरल्यानंतर कु.राजनंदिनी सोनाली मंगलसिंग पवार” यांचे प्रथमच ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर मध्ये आगमन झाल्यानंतर शहरवासियांनी त्यांचे शुक्रवारी (दि. १) क्रांती चौकात महाराष्ट्र दिनी महाराष्ट्राच्या संस्कृती आणि परंपरेनुसार त्यांचे भव्य स्वागत केले. छत्रपती शिवरायांच्या आश्वारुढ पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर कु. राजनंदिनी पवार यांनी आपले आजोबा लोकनेते बाळासाहेब पवार यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेनुसार क्रांती चौकात कु. राजनंदिनी पवार यांचे औक्षण करून फटाक्यांच्या आतशबाजीत आणि ढोल ताशांच्या गजरात त्यांचे चाहत्यांनी जोरदार स्वागत केले. यावेळी क्रांती चौकात जमलेल्या नागरिकांचे तिच्या व्यक्तिमत्त्वाने आणि आत्मविश्वासाने सर्वांचे लक्ष वेधले. यावेळी राजनंदिनीच्या आई सोनाली पवार, वडील मंगलसिंग पवार, व काका अभिजित देशमुख,भाऊ राजवर्धन पवार, बाळासाहेब औताडे, ज्ञानेश्वर शेळके यांची उपस्थिती होती. या स्वागत सोहळ्याचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सचिन लिला सुखदेव अंभोरे यांनी केले.
यावेळी कु. राजनंदिनी पवार म्हणाल्या की, मी स्पर्धा जिंकल्यानंतर पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगर मध्ये दाखल झाले आणि माझ्यावर झालेल्या शुभेच्छांच्या वर्षावामुळे मी भारावून गेले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनी आणि प्रेरणेने मी आपल्या महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करू शकले. या शहरातील प्रत्येक व्यक्तींनी मला प्रेम देऊन मला सहकार्य केले असे सांगत राजनंदिनी यांनी प्रत्येकाचे आभार मानले. जगावेगळे करण्याचे ध्येय ठेवून आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रामाणिकपणे धडपडणाऱ्या आणि तेव्हढ्याच ताकदीने स्वकर्तुत्वावर जिंकणाऱ्या ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगरच्या लेक कु. राजनंदिनी सोनाली मंगलसिंग पवार यांनी यापूर्वी मुंबई येथे झालेल्या सौंदर्य स्पर्धेत “फेमिना मिस इंडिया महाराष्ट्र २०२६” हा मुकुट पटकावला असून हि छत्रपती संभाजी नगर, मराठवाडा, आणि महाराष्ट्राच्या शिरोपेचात मानाचा तुरा खोवणारी अभिमानाची बाब आहे. या स्पर्धेनंतर त्यांनी फेमिना मिस इंडिया या सौन्दर्य स्पर्धेत प्रथम उपविजेती ठरल्याचा बहुमान मिळविल्यानंतर शहरवासियांनी पुढील वाटचालीसाठी त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. 


