छत्रपती संभाजीनगर,दि,१(जिमाका)- जनगणना २०२७ च्या पहिल्या म्हणजेच स्वगणनेच्या टप्प्यास आजपासून प्रारंभ झाला आहे. दि.१ ते १५ मे पर्यंत ही स्वगणना होणार आहे. त्यानंतर प्रगणक घरोघरी जाऊन माहिती नोंदवतील.प्रत्येक नागरिकांने आपल्या घरी येणाऱ्या प्रगणकांना योग्य व अचूक माहिती द्यावी. जनगणनेतील सहभाग हे आपले कर्तव्य आहे,अशा शब्दात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले.
महाराष्ट्र राज्य स्थापना वर्धापन दिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्यानंतर पालकमंत्री श्री. शिरसाट यांनी पत्रकार परिषदेस संबोधित केले. विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मनपा आयुक्त अमोल येडगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्रचे विशेष महानिरीक्षक विरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

