महाराष्ट्र पोलीस दलात अत्यंत उत्कृष्ट आणि गुणवत्तापूर्वक सेवा बजावल्याबद्दल दिल्या जाणाऱ्या मानाच्या ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह’ (DG Insignia) व प्रशस्तीपत्राची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हा पोलीस दलातील २ पोलीस अधिकारी आणि ८ पोलीस अंमलदार यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत हा सन्मान पटकावला आहे.
१. श्री. सत्यजीत सुधाकर ताईतवाले (पोलीस निरीक्षक): सन २००९ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) पोलीस उपनिरीक्षक पदी थेट निवड झालेले श्री. ताईतवाले यांची एकूण १८ वर्षांची सेवा झाली आहे. त्यांनी गोंदिया,मुंबई, छ. संभाजीनगर शहर आणि ग्रामीण भागात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी ३७७ बक्षिसे आणि ३१ प्रशंसापत्रे मिळवली आहेत. गंगापूर येथे कार्यरत असताना त्यांनी अवैध अग्निशस्त्रे व जिवंत काडतुसे जप्त करण्याची धाडसी कारवाई केली होती. तसेच, वैजापूर येथील एका संवेदनशील हत्या प्रकरणात अत्यंत कौशल्याने परिस्थिती हाताळून २४ तासांत आरोपींना अटक केली आणि सामाजिक सलोखा राखण्यात यश मिळवले.
२. श्री. भरत उत्तम मोरे (सहायक पोलीस निरीक्षक):
पोलीस अधीक्षक कार्यालयातील वाचक शाखेत कार्यरत असलेले श्री. भरत मोरे यांची १९ वर्षांची सेवा झाली आहे. त्यांनी अहिल्यानगर, धुळे, बीड आणि छ. संभाजीनगर ग्रामीणमधील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे तपासात आपला ठसा उमटवला आहे. शिवूर येथे प्रभारी असताना त्यांनी ५ राज्यांतून फरार असलेल्या अट्टल एटीएम चोराला १५,२०,५००/- रुपयांच्या मुद्देमालासह अटक केली होती. तसेच कोपरगाव येथे असताना नागपूर आणि मध्य प्रदेशपर्यंत तांत्रिक तपास करून ५० तोळे सोने हस्तगत करण्याची मोठी कामगिरी केली. त्यांना आजवर ३११ बक्षिसे आणि ११ प्रशंसापत्रे प्राप्त झाली आहेत.
सन्मानित पोलीस अंमलदार व त्यांची कामगिरी:
गुणवत्तापूर्वक सेवेचा उत्कृष्ट अभिलेख राखल्याबद्दल खालील अंमलदारांना देखील सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे:
• १. श्री. जगन्नाथ लक्ष्मण उबाळे (श्रेणी पोलीस उपनिरीक्षक): प्रदीर्घ सेवा काळ आणि गुन्हे प्रतिबंधक कामात सातत्यपूर्ण कामगिरी.
• २. श्री. बालु बाबुराव मोरे (श्रेणी पोलीस उपनिरीक्षक): पोलीस दलातील शिस्तबद्ध कामकाज आणि सेवा अभिलेख उत्तम राखल्याबद्दल गौरव.
• ३. श्री. दिलीप धोंडिराम पाटील (श्रेणी पोलीस उपनिरीक्षक): विविध पोलीस ठाण्यांतील कर्तव्य काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यात मोलाचा वाटा.
• ४. श्री. राजु नामदेवराव गोल्डे (श्रेणी पोलीस उपनिरीक्षक): अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्कलंकपणे दीर्घकाळ सेवा बजावल्याबद्दल सन्मान.
• ५. श्री. भारत काकासाहेब शिंदे (श्रेणी पोलीस उपनिरीक्षक): गुन्हे शोध आणि प्रतिबंधात्मक कारवायांमध्ये सक्रिय सहभाग.
• ६. श्री. परमेश्वर शिवदास आडे (पोलीस हवालदार): कठीण गुन्ह्यांच्या तपासात वरिष्ठांना तांत्रिक आणि मैदानी मदत करण्यात आघाडीवर.
• ७. श्री. रवी कुमार छगनराव किर्तीकर (पोलीस हवालदार): गोपनीय माहितीचे संकलन आणि गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात सातत्यपूर्ण कार्य.
• ८. श्री. दिपक सोपान सुरोशे (पोलीस हवालदार): पोलीस दलाच्या विविध मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग आणि उत्तम सेवा रेकॉर्ड.
• छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलाची प्रतिमा उंचावणाऱ्या वरील सर्वांचे पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड आणि अपर पोलीस अधीक्षक सौ. अन्नपुर्णा सिंह यांनी अभिनंदन केले आहे. “प्रामाणिकपणे आणि जनहितार्थ सेवा बजावणाऱ्या प्रत्येक अंमलदार यांचा हा गौरव असून, यामुळे उर्वरित दलास अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळेल,” असा विश्वास व्यक्त केला आहे.










