छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)
वैज्ञानिक दृष्टिकोनातून तणाव नियोजनाचे धडे; विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांची संकल्पना…
पोलीस दलातील महिला अधिकारी आणि अंमलदार यांना कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि कर्तव्य यांचा समतोल राखताना मोठ्या मानसिक व शारीरिक तणावाला सामोरे जावे लागते. हा तणाव केवळ वैयक्तिक नसून त्याचा परिणाम कार्यक्षमतेवरही होतो. हीच बाब लक्षात घेऊन विशेष पोलीस महानिरीक्षक (छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र) मा. श्री. वीरेंद्र मिश्र यांच्या संकल्पनेतून आणि पोलीस अधीक्षक मा. डॉ.विनय कुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. २८ एप्रिल २०२६ रोजी ‘कैलाश शिल्प सभागृह’ येथे भव्य तणावमुक्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन पोलीस कल्याण शाखेतर्फे करण्यात आले होते.
कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याता म्हणून प्रसिद्ध समुपदेशक आणि तज्ज्ञ मा. डॉ. अरुंधती भालेराव उपस्थित होत्या, तर कार्यक्रमाचे अध्यक्षपद अपर पोलीस अधीक्षक मा. श्रीमती अन्नपूर्णा सिंह यांनी भूषविले.
डॉ. अरुंधती भालेराव यांचे वैज्ञानिक मार्गदर्शन करताना सांगितले कि, तणावमुक्तीकडे केवळ आध्यात्मिक नव्हे तर ‘वैज्ञानिक’ दृष्टिकोनातून पाहणे कसे गरजेचे आहे, हे पटवून दिले. मेंदूतील ‘हॅपी हार्मोन्स’ (Endorphins) कशा प्रकारे कार्यान्वित होतात, हे त्यांनी विविध उपक्रमांतून स्पष्ट केले.
तसेच केवळ व्याख्यान न देता, छोट्या-छोट्या खेळांच्या (Activities) माध्यमातून त्यांनी महिला पोलीस अंमलदारांचा सहभाग मिळवला.
१. स्मृती आणि एकाग्रता: सर्व महिलांचा गोल रिंगण तयार करून, एकमेकींची नावे सांगण्याच्या खेळाद्वारे ‘लक्षपूर्वक ऐकणे’ आणि ‘स्मृतीला चालना देणे’ याचे महत्त्व त्यांनी पटवून दिले.
२. सर्जनशीलता: चित्र पाहून कथा तयार करण्याच्या स्पर्धेतून महिलांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्यात आला. यात सर्वोत्कृष्ट कथा सादर करणाऱ्या गटाला बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
३. अभिनय कौशल्य: ५ ते ६ महिलांचे गट करून दिलेल्या विषयावर त्यांनी छोटेखानी नाट्य सादर केले. यातून कामाचा ताण विसरून आनंदी कसे राहावे, याचे प्रात्यक्षिकच महिलांनी सादर केले.
मा. अन्नपूर्णा सिंह यांनी महिला पोलिसांच्या दुहेरी जबाबदारीवर अत्यंत प्रभावी भाष्य केले. त्या म्हणाल्या, “पोलीस दलात काम करणाऱ्या महिला या ‘मल्टी-टास्कर’ असतात. घर आणि ड्युटी अशा दोन आघाड्यांवर लढताना अनेकदा स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होते. परंतु, जर आपण वेळेचे काटेकोर व्यवस्थापन (Time Management) आणि योग्य संवाद कौशल्य आत्मसात केले, तर हा तणाव आपण संधीत रूपांतरित करू शकतो. आपल्यातील स्त्रीशक्तीचा वापर करून ड्युटी करत असताना संवेदनशील आणि कणखर कसे राहावे, याचे नियोजन करणे ही काळाची गरज आहे.”
या पकार्यक्रमाचे यशस्वी नियोजन प्रशिक्षणार्थी पोलीस उप अधीक्षक आरती पवार, प्रभारी पोलीस अधीक्षक (गृह) राजेंद्र बनसोड, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, राखीव पोलीस निरीक्षक अण्णासाहेब वाघमोडे, स.पो.नि. सिद्धेश्वर गोरे, स.पो.नि. निशा बनसोड यांनी केले असून यावेळी जिल्हाभरातील विविध पोलीस ठाणे आणि शाखांमधील सुमारे ६० ते ७० महिला अधिकारी व कर्मचारी उपस्थित होत्या.

