छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)
उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि मनोरंजनातून शिक्षण देण्यासाठी मा आयुक्त अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा प्रियदर्शनी मयूरबन कॉलनी विद्यालयात ‘मस्ती की पाठशाला’ या विशेष उन्हाळी शिबिर (समर कॅम्पचे) आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर ३० एप्रिल २०२६ या कालावधी पर्यंत पार पडणार आहे.
या समर कॅम्पचे उद्घाटन मनपा उपायुक्त अंकुश पांढरे, नगरसेविका अनिता मानकापे, नगरसेविका अर्चना निळकंठ यांच्या शुभहस्ते झाले.
याप्रसंगी स्वतः सर्व अतिथिनी पारंपारिक खेळ खेळण्याचा अनुभव घेतला. सर्व अधिकारी यांनी विद्यार्थ्यांसोबत टायर खेळण्याचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांनी विविध पारंपारिक खेळ खेळले. टायर, भोवरा, दोरीवरच्या उड्या, लंगडी, धप्पाकुटी, लिंगोरच्या इत्यादी पारंपारिक खेळ खेळण्याचा आनंद उपस्थितांनी घेतला.
याप्रसंगी अग्निशमन विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी आग विझविण्याचे विविध प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवले.
दहा मजली इमारतीवर आग लागली तर कशा पद्धतीने फायर ब्रिगेडची गाडी काम करते हे विद्यार्थ्यांसह सर्व अधिकाऱ्यांना प्रात्यक्षिक पाहण्याचा योग आला. त्यामध्ये केमिकल आग लागल्यानंतर फोम शावर प्रात्यक्षिक, आत मध्ये आग लागल्यानंतर स्प्रिंकलर पाणी फवारा चे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक संजीव सोनार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी देसले यांनी केले.
आजच्या धावपळीच्या युगात मुले मोबाईल आणि टीव्हीमध्ये व्यस्त राहत आहेत. त्यांना मैदानी खेळ, कला आणि विज्ञानाची गोडी लागावी, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या सात दिवसांच्या उपक्रमात विद्यार्थ्यांसाठी विविध नाविन्यपूर्ण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिरातील मुख्य आकर्षणे:
संगीत आणि नृत्य: तालासुरांच्या माध्यमातून मुलांचे मनोरंजन आणि कला सादरीकरण.
आर्ट अँड क्राफ्ट: चित्रकला आणि टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण.
मैदानी खेळ (Sports): शारीरिक कसरती आणि सांघिक खेळांचे आयोजन.
सिद्धार्थ गार्डन येथे सहल व प्राणी संग्रहालयास भेट
फन सायन्स (Fun Science): विज्ञानातील गमतीशीर प्रयोग आणि विज्ञानाची सोप्या भाषेत ओळख.
सांस्कृतिक कार्यक्रम: मुलांच्या आत्मविश्वासासाठी विविध सादरीकरणे.
या उन्हाळी शिबिराचा फायदा परिसरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन शाळेच्या वतीने करण्यात आले आहे. ‘गर्मीच्या सुट्टीत शिकणे, खेळणे आणि मस्तीचा हा एक अनोखा संगम’ असणार आहे.



