प्लास्टिक विरोधात सर्व पदाधिकारी एकवटले
छत्रपती संभाजीनगर, (महाराष्ट्र न्यूज टाइम्स)दि. २२ एप्रिल —
शहरातून प्रतिबंधित प्लास्टिकला हद्दपार करण्याच्या दृष्टीने महापौर, पदाधिकारी व सभागृहाने घेतलेल्या ठोस भूमिकेनुसार छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतर्फे धडक कारवाई करण्यात येत असून, आज मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक जप्त करण्यात आले. झोन क्र. २ अंतर्गत अंगुरी बाग व जुना मोंढा परिसरातील ३ ते ४ दुकानांची तपासणी करण्यात आली.
या कारवाईदरम्यान शालिमार प्लास्टिक, संजय प्लास्टिक, एनबी प्लास्टिक तसेच इतर स्थानिक विक्रेत्यांवर कारवाई करून ५१७० किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले. संबंधित विक्रेत्यांकडून एकूण ₹७५,००० इतका दंड वसूल करण्यात आला.
तपासादरम्यान संबंधित विक्रेत्यांची शहरातील विविध ठिकाणांवरील दुकाने, गोदामे तसेच ट्रान्स्पोर्ट कंपन्यांमध्येही छापे टाकून तेथील प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जप्त करण्यात आलेल्या प्लास्टिकचा तत्काळ निपटारा करण्यासाठी हर्सूल कचरा प्रक्रिया केंद्रावर श्रेडिंग करून विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात आली आहे.
महानगरपालिकेतर्फे प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात सातत्याने जनजागृती केली जात असून नागरी मित्र पथकाद्वारे नियमित कारवाईही सुरू आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकची वाहतूक व विक्री होत असल्याने ही विशेष धडक मोहीम राबविण्यात आली.
मनपा आयुक्त श्री. अमोल येडगे यांच्या आदेशानुसार व उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख श्री. नंदकिशोर भोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त श्री. रमेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली नागरी मित्र पथकाने ही कारवाई केली. या पथकात देविदास सुसर, बालाजी साबळे, सुवर्णसिंग परदेशी, जनार्दन सांगळे, संतोष बनकर, किशन निकम, ज्ञानेश्वर पाटील, रतन वाघ, नारायण फुके, जयेश मगरे यांचा समावेश होता. यावेळी स्वच्छता अधिकारी श्री. अनिल जाधव, स्वच्छता निरीक्षक सचिन मिसाळ, अभिजित गंगावणे तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.
मा. महापौर श्री. समीर राजूरकर यांनी सांगितले की, शहरात सर्रास प्लास्टिकचा वापर खपवून घेतला जाणार नाही. नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळून महानगरपालिकेला सहकार्य करावे व पर्यायी साधनांचा अवलंब करावा, असे आवाहन त्यांनी केले.
आयुक्त श्री. अमोल येडगे यांनी स्पष्ट केले की, यापुढेही शहरात प्रतिबंधित प्लास्टिकची विक्री किंवा वापर आढळल्यास कठोर कारवाई करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत प्लास्टिक बंदीवर सविस्तर चर्चा करण्यात आली होती. महापौर श्री. समीर राजूरकर, उपमहापौर श्री. राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती श्री. अनिल मकरिये, सभागृह नेते श्री. गोविंद केंद्रे, विरोधी पक्षनेते श्री. समीर सय्यद यांच्यासह सर्व पदाधिकारी व नगरसेवकांनी शहरातून प्लास्टिकला हद्दपार करण्यासाठी एकमताने भूमिका घेत प्रशासनाला कठोर कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
या धडक कारवाईबद्दल महापौर, उपमहापौर व सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वतः उपस्थित राहून महानगरपालिका प्रशासन व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

