
छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)
छत्रपती संभाजीनगर शहराच्या पर्यटन विकासाला गती देण्यासाठी आज महानगरपालिकेच्या ‘पर्यटन व्यवस्थापन समितीची’ महत्त्वाची बैठक स्मार्ट सिटी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर समीर राजूरकर होते. शहरात पर्यटकांच्या सोयीसाठी आगामी आठ दिवसांत विशेष ‘पर्यटन हेल्प डेस्क’ (Tourism Helpdesk) कार्यान्वित करण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश महापौरांनी यावेळी प्रशासनाला दिले. या हेल्प डेस्कसाठी शहरात योग्य जागेचा शोध घेऊन, तेथे पर्यटकांना मार्गदर्शन करण्यासाठी पर्यटन विभागामार्फत विशेष प्रशिक्षित गाईड्सची (Trained Guides) नियुक्ती केली जाणार आहे.
या बैठकीला उपमहापौर राजेंद्र जंजाळ, विरोधी पक्षनेते समीर साजेद, अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील आणि उपायुक्त अंकुश पांढरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच तांत्रिक आणि तज्ज्ञ मार्गदर्शनासाठी सामर्थ्य प्रतिष्ठानचे दुष्यंत पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पर्यटन विभागाच्या प्रमुख डॉ. माधुरी सावंत, ‘इन्टॅक’चे (INTACH) संकेत कुलकर्णी व आदित्य वाघमारे, पर्यटन विभागाचे उपअभियंता अभिषेक मुदिराज, MTDC चे पर्यटन अधिकारी शोएब शाह, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाचे संचालक श्रीप्रकाश पवार, पर्यटन तज्ज्ञ सारंग टाकळकर आणि स्मार्ट सिटीच्या वास्तुविशारद स्नेहा बक्षी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
बैठकीदरम्यान शहराच्या पर्यटन विकासासाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने ऐतिहासिक वास्तू आणि पुरातन वस्तूंच्या जतनासाठी महानगरपालिकेतर्फे तातडीने एक सुसज्ज ‘संवर्धन प्रयोगशाळा’ (Conservation Lab) विकसित करण्यावर चर्चा होऊन त्याला मंजुरी देण्यात आली. तसेच, शहरातील ऐतिहासिक स्थळांचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी नियमितपणे ‘हेरिटेज वॉक’ आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले. महानगरपालिका हद्दीतील ऐतिहासिक स्थळे, संशोधन केंद्रे आणि वस्तू संग्रहालयांच्या सर्वांगीण विकासासाठी तज्ज्ञांच्या समितीमार्फत नवीन धोरण निश्चित करून शहराचा कायापालट करण्याचा मानस या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

