छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाईम प्रतिनिधी)
छत्रपती संभाजीनगर,
कामाच्या ठिकाणी स्वतःची तसेच सहकाऱ्यांची काळजी घ्यावी आणि घरी देखील कोणतीही अप्रिय घटना घडणार नाही यासाठी सतर्क राहावे, असे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त श्री. अमोल येडगे यांनी केले.
अग्निशमन सप्ताहानिमित्त बन्सीलाल नगर येथील मुख्य अग्निशमन केंद्रात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी हुतात्मा अग्निशामकांना मानवंदना अर्पण करण्यात आली तसेच झेंडावंदनही करण्यात आले.
यानंतर अग्निशमन विभागातर्फे विविध प्रकारच्या आगींवर नियंत्रण कसे मिळवले जाते, विविध प्रकारचे रेस्क्यू याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. तसेच अग्निशमन विभागाची कार्यक्षमता आणि सज्जता याचेही प्रभावी प्रदर्शन करण्यात आले.
आपले मनोगत व्यक्त करताना आयुक्तांनी सांगितले की, “कामाच्या ठिकाणी स्वतःची व सहकाऱ्यांची सुरक्षितता जपणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे घरातही आगीसारख्या धोकादायक घटनांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.”
या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. रणजीत पाटील, उप आयुक्त श्री. अंकुश पांढरे, आपत्ती व्यवस्थापन कक्ष प्रमुख श्री. स्वप्निल सरदार, मुख्य अग्निशमन अधिकारी खांडेकर तसेच इतर अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

