
तरुण शेतकऱ्यांची ‘गरुडझेप’; ‘फ्रेश बाय फार्म’ विक्री केंद्राचे उद्घाटन
छत्रपती संभाजीनगर, ( महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)— प्रभात बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली टेक्सन इरिगेशन व मधुर प्रभात फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फ्रेश बाय फार्म’ या थेट शेतकरी ते ग्राहक फळे व भाजीपाला विक्री केंद्राचे उद्घाटन उत्साहात पार पडले.
शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य व हमीभाव मिळावा तसेच ग्राहकांना वाजवी दरात ताजे व उच्च दर्जाचे फळे व भाजीपाला उपलब्ध व्हावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. ग्रामीण भागातील शेतकरी थेट शहराच्या बाजारपेठेशी जोडले जावेत, या हेतूने छत्रपती संभाजीनगर शहरात हे विक्री केंद्र सुरू करण्यात आले असून, शेतकरी सक्षमीकरणाच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.
या उपक्रमासाठी तरुण शेतकरी श्री. कुणाल चोंधे, श्री. कृष्णा सुलताने व श्री. विशाल खराटे यांनी पुढाकार घेत शेतकऱ्यांसाठी प्रभावी विपणन माध्यम उपलब्ध करून दिले आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारभाव मिळण्यास मदत होणार असून ग्राहकांनाही दर्जेदार व ताज्या भाजीपाल्याचा लाभ मिळणार आहे.
उद्घाटन प्रसंगी शहराचे माजी उपमहापौर तथा नगरसेवक ॲड. विजयभाऊ औताडे, जिल्हा परिषद सदस्य श्री. आजिनाथभाऊ धामणे, गटशेती प्रणेते डॉ. भगवानराव कापसे, श्री. संतोष कावळे पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी उपक्रमाचे कौतुक करत तरुण शेतकऱ्यांना नव्या व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या.

